महाराष्ट्रावर शोककळा,नेपाळ बस दुर्घटनेत जळगावातील 24 जणांचा मृत्यू

0
801
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नेपाळ बस अपघातातील 24 मृतदेह वायुसेनेच्या विमानाने महाराष्ट्रात शनिवारी आणणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काठमांडू/जळगाव:– भारतातून नेपाळमध्ये गेलेल्या भाविकांच्या बसला नेपाळमध्ये शुक्रवारी (23 ऑगस्ट 2024) भीषण अपघात झाला. बस थेट नदीत कोसळली. या बसमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचा सुद्धा समावेश होता.नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 24 जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या अपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने शनिवारी (24 ऑगस्ट 2024) जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.

नेपाळमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भुसावळ तालुक्यातील प्रवाशांच्या बसला उत्तर काठमांडूकडे (नेपाळ) जात असताना शुक्रवारी भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशातील ही खासगी बस लगतच्या मर्स्यांगडी नदीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे.तर काही गंभीर जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधून हे भाविक काठमांडूला चालले होते. पोखरा येथे काही काळ थांबा घेतल्यानंतर ती बस काठमांडूच्या दिशेने निघाली.तनहुन जिल्ह्यात एना पहारा महामार्गावर बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती महामार्गावरून थेट डोंगररांगांमध्ये असलेल्या नदीमध्ये जाऊन कोसळली. या बसमध्ये चालक आणि सहाय्यक चालकासह ४३ प्रवासी होते. मृत्युमुखी पडलेले सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव- तळवेल परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. जखमींपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळमधील तनहुन जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२२) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नेपाळची राजधानी काठमांडूपासून १२० किलोमीटरवर पश्‍चिमेकडे अबुखैरेनी गावाजवळ हा अपघात घडला. नेपाळमधील जवानांचे मदत पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना काही भाविकांना वाचविण्यात यश आले असून अन्य बेपत्ता भाविकांचा शोध घेतला जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली.मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू. त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शनिवारी हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.

बसची नोंदणी यूपीमधील

ज्या बसला हा अपघात घडला ती गोरखपूरच्या केसरवाणी ‘टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी’ची (क्र. यूपी ५३ एफ.टी ७६२३) होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणाऱ्या सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर तिची नोंदणी आहे. महाराष्ट्रातील काही भाविकांनी जवळपास चार महिन्यांपूर्वी नेपाळला जाण्यासाठी ‘केसरवाणी ट्रॅव्हल्स’च्या तीन बस बुक केल्या होत्या.

एकूण तीन बस

सुमारे ११० लोकांना घेऊन तीन बस प्रवास करीत होत्या. यापैकी जळगाव जिल्ह्यातील ४० ते ५० भाविक दोन बसमधून प्रवास करीत होते. तिसरी बस नेपाळमधील स्थानिक भक्तांची असल्याचे सांगितले जाते. या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांचाही मृत्यू झाला. दुसऱ्या बसमध्ये प्रवास करणारे लोक नेपाळमधील मुंगलिंगमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाण्याचा प्रवाह प्रचंड

नेपाळच्या डोंगराळ भागातील नद्या या प्रचंड वेगाने वाहतात. मागील काही दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत असून नदीतील पाण्याचा रंग देखील काहीसा मातकट झाला असल्याने प्रवाशांचा शोध घेणे हे बचाव पथकासाठी आणखीनच आव्हानात्मक बनले आहे. साधारणपणे नेपाळमध्ये जून ते सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो त्यामुळे याभागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते. मागील महिन्यामध्ये प्रवाशांच्या दोन बसला भूस्खलनामुळे अशाच पद्धतीने भीषण अपघात झाला होता.

रक्षा खडसे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे बोलताना म्हणाल्या की,नेपाळमध्ये भाविकांच्या बसला मोठा अपघात झाला असून त्यातील बहुतांश भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव-तळवेल परिसरातील आहेत. अपघातग्रस्तांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय पातळीवरूनही मदतकार्य पोहोचविण्याबाबत चर्चा केली असून भाविकांना सर्व सहकार्य करण्यात येत आहे. आपण सातत्याने नेपाळमधील भारतीय दूतावास, केंद्रीय गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत.असेही खडसे म्हणाल्या.

तर भाविक जळगावचे असल्याची माहितीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं, नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते आहे. राज्य सरकारने तात्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत.

बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील 24 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील मृतकांची यादी आता जाहीर करण्यात आली आहे.

1)सुहास प्रभाकर राणे (45 वर्षे)
2)सरला सुहास राणे (42 वर्षे)
3)निलिमा सुनील घाडे (57 वर्षे)
4)तुळशीराम तायडे (62 वर्षे)
5)मंगला विलास राणे (45 वर्षे)
6)सुधाकर जावळे
7)रोहिणी जावळे
8)सागर कडू जावळे
9)भारती प्रकास जावळे
10)संदीप राजाराम सरोदे
11)पल्लवी संदीप सरोदे
12)गणेश पांडुरंग भारंबे
13)सुलभा पांडुरंग भारंबे
14)मिनल गणेश भारंबे
15)परी गणेश भारंबे
16)निलिमा चंद्रकांत जावळे
17)पंकज भगवान भारंबे
18)अनिता अविनाश पाटील
19)मुर्तूजा खान
20)अनुप सरोदे
21)सरला तायडे
22)सुमन वारके
23)रुपाली सरोदे
24)गोकर्णी संदीप सरोदे
25)साधना सुहास राणे
26)सरोज मनोज भिरुड
27)एक बेपत्ता