पुणे, रायगड, सातारा जिल्ह्यात आज अतिवृष्टीची शक्यता

0
49

पुणे:- राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच पार्श्वभूमीवर पुणे, रायगड आणि सातारा जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वारे जोरात वाहत आहेत. त्यांचा वेग वाढला असून कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने राज्यात पाऊस वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे.

राज्यात काल अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. आजही पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. पुणे, रायगड, सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, जळगाव येथेही मुसळधार पावसाची शक्यता आहे.