अमरावती : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगावपेठ नजीक भरधाव शिवशाही एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रस्ता ओलांडणाऱ्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियत्रण सुटल्याने बस उलटल्याचे बसचालकाने सांगितले. जखमी प्रवाशांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एमएच ०९ / ईएम १७७८ क्रमाकांची शिवशाही बस ही नागपूरहून अकोलाकडे जात होती. नांदगावपेठ नजीक अचानकपणे गाय रस्त्यावर आली. गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसची गायीला धडक बसली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.बसमधून एकूण ३५ जण प्रवास करीत होते. या अपघातात जखमी झालेल्या २८ जणांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात बसच्या काचा संपूर्णपणे फुटल्या. परिसरातील नागरिकांनी बचावकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. आपातकालीन दरवाजातून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.