कुटुंबियांना भेटायला आला अन् फसला,मालवण घटनेतील मुख्य आरोपी जयदीप आपटेला अटक

0
215

सिंधुदुर्ग ::-मालवण घटनेतील मुख्य आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी तो कल्याणच्या राहत्या घरी आला होता. यावेळी पोलिसांनी जयदीप आपटेला ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार जयदीप आपटेच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सातहून अधिक पथके तैनात केली होती. ही पथके त्याचा शोध घेत होती. 26 ऑगस्ट रोजी शिवाजी पुतळा पडल्याच्या दिवसापासून पोलीस 24 वर्षीय जयदीप आपटेचा शोध घेत होते, मात्र आज तो त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जयदीप आपटेच्या घरी धाव घेतली. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग पुणे शाखा कल्याण गुन्हे शाखा ठाणे गुन्हे शाखा तसेच स्थानिक बाजारपेठ पोलीस जयदीप आपटे याचा शोध घेत होते. जयदीपवर गुन्हा दाखल होताच, कल्याण येथील घराला टाळा लावून त्याचे कुटुंब देखील शहापूर येथे गेले होते. कल्याण गुन्हे शाखेने शहापूर येथे त्याच्या कुटुंबियांची चौकशी करून त्यांना पुन्हा कल्याण येथे राहत्या घरी आणले होते. तसेच पोलिसांच्या निगराणी खाली हे कुटुंब होते. बुधवारी रात्री उशिरा जयदीप हा राहत्या घरी आई आणि पत्नीला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांची नजर चुकवून तो आला, मात्र पोलिसांना खबर लागताच स्थानिक बाजारपेठ पोलीस व कल्याण गुन्हे शाखेने जयदीप याला अटक केली आहे.

शिवरायांचा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटे याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआउट सर्कुलर जारी केले होते. विमानतळ, सागरी बंदर किंवा अन्य मार्गाने आरोपी देशाबाहेर जाणार नाही, याची खबरदारी पोलीस घेत होते. यासाठी त्याचा सर्वत्र तपास सुरु होता. सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक ठाणे, सिंधुदुर्ग, मुंबई, कोल्हापूरसह अनेक ठिकाणी त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी सात पथके तैनात करण्याक आली होती.

शिवरायांचा ३५ फूट उंच पुतळा बनवण्याचे कंत्राट शिल्पकार आणि ठेकेदार जयदीप आपटे यांना देण्यात आले होते. पुतळा उभारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त मालवण तालुक्यातील किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र गेल्या महिन्यात ही मूर्ती पडली. पुतळा पडल्यानंतर मालवण पोलिसांनी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पाटील यांना अटक झाली होती. तर जयदीप आपटे फरार होता.

‘आधीच ठरलेलं…’, जयदीप आपटेला अटक होताच वकिलांचा मोठा गौप्यस्फोट

जयदीप आपटे आपल्या कुटुंबीयांना भेटायला आला असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येतेय. मात्र यावर जयदीप आपटे यांचे वकील गणेश सोवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयदीप आपटे काळोखातून आला आणि पोलिसांनी पकडलं ही स्टोरी साफ खोटी आहे. या प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं जात असून काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्यात, असं गणेश सोवणे यांनी म्हटलं आहे.या सर्व प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी न जाता जयदीपने स्वतः सरेंडर होणे आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे हे आम्ही उचित समजलं. त्याप्रमाणे कुटुंबीयांसोबत चर्चा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला येऊन स्वतःला सरेंडर करेल आणि पुढची सर्व न्यायालय प्रक्रिया होईल हा कालच निर्णय झाला होता त्यानुसार सर्व घडलं आहे. या प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं जात आहे. त्यामुळं या प्रकरणाला आणखी फाटे फुटू नयेत सर्व शांततेत व्हावे हाच त्याच्यामागचा हेतू होता. कोणतीही लपाछपी करायची नव्हती, असं गणेश सोवणे यांनी म्हटलं आहे.

जयदीप काळोखातून आला आणि पोलिसांनी पकडलं ही काही स्टोरी सांगितले जाते हे सगळं साफ खोटं आहे, असं सांगतच तपास यंत्रणेला सहकार्य करणे, जे काही आरोप झाले ते कसे निराधार आहे हे तपास यंत्रणेला सांगणं आणि न्यायालयाला सामोरे जाणे हे आम्ही ठरवलेलं आहे. मालवणला गेल्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करणार आहे. तेव्हा तिथे हजर होऊ आणि जो युक्तिवाद करायचा आहे तो केला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

लूकआऊट नोटीसही जारी केली होती

पोलिसांनी आपटेच्या शोधासाठी सात पथके रवाना केली होती. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव अग्रवाल यांनी आपटेविरोधात 3 सप्टेंबर रोजी लूकआऊट नोटीसही जारी केली होती. कोणत्याही राष्ट्रीय विमानतळावरून बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तत्काळ ताब्यात घेण्यासाठी ही नोटीस होती. त्यानंतरही आपटे पोलिसांना सापडत नसल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.

सिंधुदुर्ग पोलिसांनी ताबा घेतला

पुतळा दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग पोलिसातही आपटेवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी आपटेच्या कल्याण येथील घरी येऊन झाडाझडती घेतली होती. सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक कल्याण मध्येच थांबले होते. आज आपटेला कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रथम त्याला डीसीपी कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात आला.

घरात शिरला आणि जेरबंद झाला

दरम्यान आज रात्री उशिरा जयदीप आपटे हा चोरून लपून त्याच्या कल्याणमधील दूध नाका गुप्ते चौकातील घरी आई आणि पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यामुळे पोलिसांनी घराभोवती सापळा रचला. आपटे घरात शिरताच पोलिसांनी झडप घालून त्याला जेरबंद केले.