अकोल्याचे शिवदीप लांडे बिहार मधील पूर्नियाचे पोलिस महानिरीक्षक…

0
164
अकोला -जिल्ह्यातील पारसच्या मातीत शिकून लहानाचे मोठे झालेले तथा अकोला “जिल्ह्याचे वैभव” असलेले शिवदीप वामनराव लांडे हे बिहार पोलिस दलातील “सिंघम” म्हणूनच ओळखले जातात.या आयपीएस शिवदीप लांडे यांची नुकतीच बिहार राज्यातील पूर्णिया या परिक्षेत्राचे “पोलिस महानिरीक्षक” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी ते तिरहुत रेंजचे महानिरीक्षक होते.
शिवदीप वामनराव लांडे हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते दहशतवाद व अमली पदार्थ विरोधी पथक मुंबई,येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून पाच वर्षे कार्यरत होते.त्याकाळात त्यांनी केलेल्या अमली पदार्थ विरोधी कारवायांमुळे महाराष्ट्रात चांगलेच चर्चेत आले होते.
   शिवदीप लांडे ह्यांचा जन्म अकोला जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बाळापूर तालुक्यातील पारस ह्या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात २९ ऑगस्ट १९७६ साली झाला असून त्यांचे प्राथमिक शिक्षण देखील त्याच ठिकाणी पूर्ण झाले आहे.तर संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली.लहान असतानाच जोपासलेली व्यायामाची सवय पुढे शिक्षण घेत असतानाही कायम असल्याने आणि एक ध्येय निश्चित करून त्याच दृष्टीने वाटचाल केल्याने आयपीएस पर्यंतचा खडतर प्रवास यशस्वी झाला आणि घेतलेल्या मेहनतीचे खऱ्या अर्थाने चीज झाले.पुढे बिहार कॅडर मिळाल्याने तिकडेच सर्वार्थाने झोकून देवून काम केल्याने “प्रचंड लोकप्रियता” त्यांना मिळाली.त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या ठिकाणची गुन्हेगारी तर संपुष्टात आलीच परंतु सोबतच स्वतःच्या राज्यातील जनतेनेही दिले नसते इतके “प्रेम व जिव्हाळा” बिहारच्या जनतेने त्यांना दिला.खऱ्या अर्थाने “सिंघम” या शब्दाचा, उपाधीचा जन्मच मुळात शिवदीप लांडे यांच्या साठी झाला आहे. त्यांच्या कामाचे स्वरूप व त्यांना मिळालेले यश पाहून काही हिंदी सिनेमे देखील काढण्यात आले आणि ते त्याकाळी हिट देखील झालेले आहेत.
पटना ह्या राजधानीच्या शहरात एसपी म्हणून काम करीत असताना त्यांनी स्वतः फील्ड मध्ये उतरून जी काही कामे केलीत आणि गुन्हेगारांना स्वतः “गचांडी” धरून गजाआड केले,त्यांच्या त्या कामांनी त्यांना इतकी प्रसिद्धी दिली की त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडत असे. रस्त्याने ते राजकीय नेत्यांच्या लवाजम्या सोबत असले तर लोकांची गर्दी त्यांच्याकडे जमा व्हायची आणि नेते मात्र एकटे पडायचे.शेवटी “असुयेपोटी” त्यांची बदली पटण्यातून लांब करण्यात आली होती.
 गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना मुंबई शहरात पाच वर्षांसाठी प्रति नियुक्तीवर पाठविण्यात आले त्यावेळी बिहार मधील जनतेने त्यांना परत बिहारमध्ये बोलवा म्हणून जी काही आंदोलने केली होती ती अजूनही या देशातील जनता विसरलेली नाही.इतके प्रेम आज पर्यंत एकाही पोलिस अधिकाऱ्याच्या “नशिबी” आलेले नाही.
महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी अमली पदार्थ विरोधी पथकात प्रमुख या नात्याने त्यांनी केलेल्या कारवाया आणि त्यांच्या कामाच्या सपाटयाने अमली पदार्थ व्यावसायिकांचे पुरते “कंबरडे मोडले” होते.जीव लावून काम करणे हा त्यांचा स्वभाव व “स्थायीभाव” असल्याने जिथे गेले त्याठिकाणी आपल्या कामाने त्यांनी लोकांची मने जिंकली तर वरिष्ठांची शाबाशी सुद्धा मिळविली आहे.
शिवदीप लांडे ह्यांना आपल्या जन्म गावाची सेवा करण्याची,गावांसाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती.ती त्यांनी आपल्या आईच्या हातून पूर्ण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला.गेल्या दहा वर्षांआधी त्यांच्या आईला त्यांनी अकोला जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आणले होते.अकोला जिल्हा परिषदेत त्यांनी पाच वर्षे यशस्वीरीत्या आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.
त्यांचे लग्न त्याकाळातील एक वजनदार राजकारणी नेते व मंत्री विजय शिवतारे ह्यांच्या कन्या ममता शिवतारे सोबत झाले आहे. प्रशासकीय सेवेत असताना जनतेची सेवा करण्यात मर्यादा येतात,परंतु राजकीय व्यक्तीला अशा कोणत्याही प्रकारची मर्यादा आडवी येत नाही हे ओळखून त्यांनी आपले कनिष्ठ बंधू कलिंग वामनराव लांडे यांना बाळापूर मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी देवून निवडणूक लढवून पाहिली होती,परंतु दुर्दैवाने त्यांना त्यात अपयश आले.पुढे आईचे वाढते वय पाहून त्यांनाही राजकारणातून माघार घ्यायला लावली होती. मात्र त्यांच्या आईच्या कारकीर्दीत झालेली कामे आजही त्यांच्या प्रमानिकतेची साक्ष देवून जातात.
    गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी आपले आत्मचरित्रपर पुस्तक “WOMAN BEHIND THE LION”  प्रकाशित केले असून त्यात त्यांनी आपल्या खडतर आयुष्याचा उलगडा करून त्यांच्या आईने त्यांच्यासाठी काय काय केले याचे विस्तृत वर्णन केले आहे.जर एखाद्या व्यक्तीच्या मागे त्याची आई किंवा एखादी स्त्री जर खंबीरपणे उभी राहिली तर तो काय करू शकतो.याची व्यवस्थित सांगड घालून अगदी वैचारिक लेखन त्यांनी केले आहे.बिहारच्या जनतेने हे पुस्तक डोक्यावर घेतले असून त्याची पहिली आवृत्ती हातोहात संपली आहे. बिहारसारख्या आमच्या लेखी “अनपढ” असलेल्या राज्यात हे घडते आहे.आमच्या जिल्ह्यातील कुणाही कडे हे पुस्तक नसेल याची खात्री आहे.
     आज आमच्या अकोला जिल्ह्यातील  पोलिस भरतीला उभे राहिलेल्या उमेदवाराला जर “शिवदीप लांडे” कोण आहेत ? हे विचारले तर तो मात्र काहीच सांगू शकणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे.जर आमच्या मुलांना शिवदीप लांडे कोण आहेत हेच माहित नसेल तर अकोला जिल्ह्यात असे दोन चार शिवदीप लांडे कसे तयार होतील हाच मोठ्ठा प्रश्न आहे.
अकोल्याचे सुपुत्र शिवदीप लांडे आपली जन्मभूमी व आपल्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली नाही म्हणून ते जिथे कुठे जातील तिथल्या लोकांची अडवणुकितून सोडवणूक करून म्हणा वा गुन्हेगारांना वेसण लावून सर्वसामान्यांचे जीवन जगणे सुसह्य करीत आहेत.मुंबई मधून दोन वर्षांपूर्वीच त्यांची  प्रतिनियुक्ती संपल्यावर बिहारच्या जनतेने त्यांचे मनापासून स्वागत केले आणि ते आजही बिहारच्या जनतेने ते त्यांच्या मनातील “सिंघम” आहेत हे दाखवून दिले तर ते कायम “सिंघम” राहतील हे शिवदीप लांडे ह्यांनी देखील आपल्या कृतीने बिहारच्या जनतेला दाखवून दिले आहे.
   त्यांनी बिहार राज्यातील अररीया, पूर्णिया व मुंगेर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पद सांभाळल्या नंतर कोसी या विभागाचे डीआयजी म्हणून काम पाहिले आहे.तर याआधी तीरहुत या विभागाचे पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहत होते.नुकतीच त्यांची पूर्णिया या विभागाचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
    विदर्भातील अकोल्याचे शिवदीप लांडे आज बिहारमध्ये एका “परिक्षेत्राचे महानिरीक्षक” आहेत येत्या काही वर्षात संपूर्ण बिहार राज्याचे “पोलिस महासंचालक” होणारच आहेत.तेव्हा तुमची आमची नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेची छाती “चार इंचाने फुगणारच” आहे.मित्रांनो ती आजच “अर्ध्या इंचाने” फुगवून शिवदीप लांडे कोण आहेत हे आपल्या मुलांना सांगा ना..!