खाकीमधील ममताबेवारस एका दिवसाच्या भुकेल्या बाळाला महिला पोलीस कर्मचाऱ्याने पाजले दूध

0
533
वाढदिवसाच्या शुभेच्छा

बुलढाणा:– सद् रक्षणाय, खल निग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात. कधी-कधी पोलिसांना त्यांचा खाक्या दाखवावा लागतो. मात्र या खाकीमध्येही शेवटी एक मनुष्य असून या खाकीत एक वडिलाचं प्रेम, एक आईची ‘ममता’ लपलेली असते. याचा प्रत्यय बुलढाण्यातील एका घटनेतून आला आहे.

अवघ्या एक दिवसाच्या भुकेल्या अनोळखी चिमुकलीला बुलढाणा शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने चक्क आपलं स्वतःचं दूध पाजून त्या चिमुकलीला शांत केलं. या महिला कर्मचाऱ्यानं केलेल्या या कार्यामुळे त्यांचं कौतुक तर होतच आहे. मात्र या प्रकारामुळे खाकीमधली ‘ममता’ देखील सर्वांसमोर आली आहे. अनोळखी एका दिवसाच्या भुकेल्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याचं नाव योगिता शिवाजी डुकरे असं आहे. त्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

लोणार येथून एका इसमाने एका दिवसाच्या चिमुकलीला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात ठेवण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी, शनिवारी आणलं होतं. परंतु अनाथ आश्रमाने पोलिसांत तक्रार नोंदवण्यास सांगितलं. दरम्यान हा इसम या चिमुकलीला त्याच दिवशी रात्रीच्या आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास बुलढाणा शहर पोलिसात तक्रार द्यायला पोहोचला होता. ही चिमुकली एका वेडसर महिलेची असून तिने या चिमुकलीला बेवारस सोडून निघून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. म्हणून तिला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणल्याचं या इसमानं पोलिसांना सांगितलं.

सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली या इसमाकडे असल्याने ती उपाशी होती. याच कारणाने ती व्याकुळ होऊन रडत होती. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहताच त्यांच्यामधील ‘वात्सल्यभाव’ जागृत होवून त्यांना कळलं की ही चिमुकली उपाशी आहे. त्यांनी लगेच परवानगीने या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजून शांत केलं. विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांना एक ते दीड वर्षाचं बाळ असल्याने त्यांना ती चिमुकली उपाशी असल्याचं लक्षात आलं.