ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराची शासनाकडुन घोषणा!,१४ आक्टोंबरपर्यंत पुरस्कारासाठी अर्ज

0
674

मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
सहा महसुली विभागातील सहा समाजसेवी महिलांना मिळणार प्रत्येकी १ लाखाचा पुरस्कार
उच्च शिक्षण संचालकांनी मागीतले १४ आक्टोंबरपर्यंत पुरस्कारासाठी अर्ज

गोंदिया,दि.२०ः- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य हे ऐतिहासिक असुन, अनेकांना प्रेरणा देणारे आहे.यातुनच राज्यातील अनेक महिला प्रेरणा घेवुन मुलींचे शिक्षण, समाजसेवा, महिलासक्षमीकरण यात निरपेक्षपणे कार्य करीत असतात.त्यांचेसाठी राज्य शासनाने १९८१ साली सावित्रीबाई फुले पुरस्कार सुरू केला होता.पण काही कारणामुळे तो २०१३ पासुन बंद झालेला होता.
यासाठी अनेक समाजसेवी संघटना आणि महात्मा फुले समता परीषदेचे उपाध्यक्ष व महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे तसेच चळवळीतील कार्यकर्त्यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालुन हा पुरस्कार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या नावानी पुन्हा सुरू करून, त्यातील पुरस्काराची रक्कम ही सहा महसुली विभागातील निवडलेल्या सहा महिलासाठी प्रत्येकी १ लाख करण्यात यावी,अशी विनंती केली होती.
याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र देवुन, पुन्हा नव्याने हा पुरस्कार सुरू करण्याची मागणी करीत त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.शेवटी शासनाने १६ जानेवारी व २ फेबुवारी २०२४ ला शासन निर्णय काढुन सामाजिक कार्य करणार्‍या महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या नावाने, प्रति एक लाख पुरस्कार व प्रशस्तीपत्र देण्याचे जाहीर केले.
त्यानुसार आता उच्च शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. शैलेंद्र देवळाणकर यांनी राज्यातील सहाही महसुली विभागामधुन प्रत्येकी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेची निवड करण्यासाठी १४ आक्टोंबर २०२४ पर्यंत अर्ज मागीतले आहे.या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी किमान ५० वर्षे वयोमर्यादा, तसे पोलीस पडताळणी अहवाल मागीतला असुन, शिक्षक किंवा नोकरदार महिलांना यासाठी अर्ज करता येणार नाही.
अर्जासोबत, महिला कार्यकर्त्यांनी त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्य,महिला सक्षमीकरण,स्री शिक्षण,सामाजिक परीवर्तन,महिलांचे स्वयरोजगार,वृध्द व निराधार महिलांसाठी वृध्दाश्रम,अनाथ बालकांसाठी अनाथालय,महिलांसाठी बचत गट स्थापन करणे, महिलांना स्वावलंबी बणविणे ईत्यादी केलेल्या कार्याचा तपशील पुराव्यासहीत जोडावयाचा आहे.
या पुरस्कारासाठी शासनाने निवड समिती तयार केली असुन, ही समिती राज्यातील सहाही महसुली विभागामधुन,सहा पुरस्कार्थीं महिलांची निवड करणार आहेत. जर अर्ज आले नाहीत, किंवा पात्र व्यक्तींचे अर्ज नसेल, तर या निवड समितीला, राज्यात शोध घेवून,योग्य व सन्माननीय पात्र महिलांना या पुरस्कारासाठी नामनिर्देशीत करून, पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तसेच हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा ज्ञानज्योतीचे जन्मग्राम नायगाव जि. सातारा येथे, ३ जानेवारीला शासनाच्या महिला मुक्तीदिन सोहळ्यात देण्याचे नियोजन आहे.
तरी राज्यातील सहाही महसुली विभागातील महिला कार्यकर्त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी १४ आक्टोंबर२०२४ च्या आत, संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, बहिरट पाटील चौक, माॅडेल काॅलनी शिवाजी नगर पुणे ४११०१६ या पत्यावर व्यक्तीश: किंवा पोस्टाव्दारे, अर्ज सादर करावा, असे आवाहन, महाज्योतीचे माजी संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी केले आहे.