संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिरेगावबांध ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

0
487

23 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार
गोंदिया – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-19 अंतर्गत राबविण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायत पात्र ठरली आहे. या स्पर्धेचे पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 23 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सन 2018-19 या वर्षासाठी राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी जिल्हा परिषद गटातून पात्र ठरलेल्या सिरेगावबांध या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय तपासणी समिती कडून तपासणी करण्यात आली. यात जिल्हास्तरावर देवरी तालुक्यातील भागी/सि प्रथम तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकावत दोन्ही ग्रामपंचायती विभागीय पुरस्कारासाठी पात्र ठरल्या होत्या. विभागीय स्पर्धेत या दोन्ही ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. या ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय तपासणी 6 नोव्हेंबर 2022 ते 8 नोव्हेंबर 2022 दरम्यान समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी तसेच अवर सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय मुंबई चंद्रकांत मोरे, समिती सदस्य तसेच कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे, सहायक कक्ष अधिकारी पात्रे यांनी केली होती.
राज्यस्तरीय स्पर्धेत कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), नागपूर व अमरावती या सहा विभागातून १४ ग्रामपंचायती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. सुरुवातीला सदर पुरस्कार वितरण सोहळा 11 मार्च रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव सदर कार्यक्रम रद्द करण्यात आता नव्याने 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचे अभियान कालावधीतील तसेच विद्यमान सरपंच/उपसरपंच/सदस्य/ग्रामसेवक तसेच विद्यमान पंचायत समिती सभापती/उपसभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, गटविकास अधिकारी यांना उपस्थित राहण्याबाबत निमंत्रित करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सिरेगावबांध ग्रामपंचायतीचे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजी.यशवंत गणवीर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आनंदराव पिंगळे, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हा समन्वयक व शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार भागचंद्र रहांगडाले यांनी अभिनंदन केले आहे.

उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यमान जिल्हाधिकारी व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही होणार सत्कार!
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविताना अभियान कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्यमान गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर तसेच जिल्हा परिषद गोंदियाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्यमान जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग अनिल पाटील यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने केलेल्या तयारीचा ग्रामपंचायत पदाधिकारी, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत आढावा घेणे, राज्यस्तरीय तपासणी समिती समवेत तपासणी वेळी वा तपासणीच्या अगोदर ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून शासन निर्णयामध्ये नमूद निर्देशानुसार परिपूर्ण अहवाल तयार करण्याच्या सूचना वा मार्गदर्शन करणे, ग्रामस्थ व पदाधिकारी यांचे मनोधैर्य वाढविणे, ग्रामपंचायतीस राज्यस्तरावरील पुरस्कार मिळण्यामध्ये मौलिक योगदान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभावी अंमलबजावणी व या अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यमान जिल्हाधिकारी व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग प्रजित नायर, विद्यमान जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया अनिल पाटील यांना गौरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब – जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

-अनेक वर्षानंतर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासाठी पात्र ठरली असल्याने निश्चितच जिल्ह्यासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गावाचा विकास साधा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले आहे.

इतर ग्रामपंचायतींनीही आदर्श घेत विकास करावा- मुकाअ एम. मुरुगानंथम –
सिरेगावबांध सारखी छोटीशी ग्रामपंचायत आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर राज्यस्तरावर जाऊन पुरस्कार प्राप्त करते हे कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही या ग्रामपंचायतीचे अनुकरण करीत गावे आदर्श करण्यावर भर द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले आहे.