मुंबई – राज्यातील विधानसभेच्या निवडणुका नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. त्यामुळे शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्तांना भेटून रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली.
शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही महायुती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्या नेहमी सरकारला अनुकूल अशी भूमिका घेऊन मदत करत असतात, असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत, अन्यथा निवडणूक नि:पक्ष होणार नाही. अशी पक्षाची भूमिका असून निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे पटोले यांनी सांगितले.
खासगी सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र सुरू करण्याला काँग्रेस पक्षाने विरोध केला असून मतदान हे सरकारी इमारतीतच झाले पाहिजे. तसेच मतदानाची आकडेवारी देणारे १७ सी फॉर्म मतदानानंतर लगेचच मतदान प्रतिनिधींना देण्यात यावेत अशी भूमिकाही आयोगाकडे मांडल्याचे मुनाफ हकीम यांनी सांगितले.