मुंबई,दि.२६ः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष बड्या नेत्यांना उमेदवारी देत आहेत. अशातच आता वरळी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मोठा डाव टाकला आहे. कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार असलेले आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभेत शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवले आहे.
मिलिंद देवरा हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र, त्यांना आमदारकीसाठी वरळी विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्यात आलं आहे. अशातच आता वरळी विधानसभेत विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मनसेने देखील दिग्गज नेते संदीप देशपांडे यांना उमदेवारी दिली आहे. अशातच आता वरळीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून देखील उमदेवार मैदानात उतरवला आहे.
यासंदर्भात राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा लढवून मी वरळीकरांना न्याय देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर दाखवला आहे. त्यामुळे लवकरच आम्ही वरळी मतदारसंघाबाबत आमचं पुढील धोरण देखील जाहीर करू असे म्हणत राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी उमेदवारी जाहीर झाल्याचं जाहीर केलं आहे.त्यामुळे आता आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे व शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांचे मोठे आव्हान असणार आहे.