सत्तास्थापनेच्या स्पर्धेत मविआ आघाडीवर-‘ग्राउंड लेव्हल’वर तुतारी, मशालची चर्चा

0
110

मुंबई, १४ नोव्हेंबर– पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राने गत पाच वर्षांमध्ये राजकीय पक्षांची शकले पडतांना बघितले. सुसंस्कृत राजकारणाची मुर्हूतमेढ रोवणाऱ्या राज्यात रसातळाला गेलेल्या राजकारणामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार बराच ‘सायलेंट’ आहे. त्यांनी कुठल्या पक्षांला यंदा सत्तेत आणायचे हे ठरवले आहे. अशात सत्तास्थापनेच्या स्पर्धेत मविआ आघाडीवर आहे, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी गुरूवारी (ता.१४) व्यक्त केले.

८३ व्या वर्षी देखील शरद पवार प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. उद्धव ठाकरे देखील त्यांच्यासोबत झालेला ‘दगाफटका’ जनता दरबारात मांडून मतांचा जोगवा मागत आहेत. अशात ग्राउंड लेव्हलवर तुतारी आणि मशालचीच चर्चा सुरू असल्याचे पाटील म्हणाले. अनेक भागांमध्ये भाजपच्या उमेदवारांचे पारडं जड आहे. पंरतु, पवार-ठाकरेंच्या बाजूने एक ‘सायलेंट भावनिक लाट’ बघायला मिळत आहे. या लाटेत काँग्रेसला थेट फायदा होईल, असा दावा पाटील यांनी केला.

भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी, एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी लावलेली फिल्डींग आणि एकटे पडलेले अजित पवार यावरून महायुतीला निवडणूक जड जात असल्याचे चित्र उभे राहीले आहे. अशातच ‘एक हे तो सेफ है’ या घोषणेच्या आधारे आता युतीला प्रचार अभियान केंद्रित करावे लागत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ‘बटेंगें-कटेंगे’ अशी भाषा वापरने विरोधात जात असल्याचे लक्षात येताच आणि अजित पवारांनी या घोषणेचा समाचार घेतल्या नंतर महायुतीने घोषणा बदलवली. पंरतु,महायुतीच्या नेत्यांच्या देहबोलीवरून यंदाची निवडणूक त्यांना जड जात असल्याचे दिसून येत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.