गोंदिया/नागपूर,दि.१५ः महायुती सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज सायकांळी पार पडला.फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.भाजपा, शिवसेना तसेच राष्ट्रवादीकडून ज्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे, त्यांना थेट फोन करण्यात आले.परंतु दुपारपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळांना मात्र फोन करण्यात आले नाही.त्यामुळे मराठा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्रातील ओबीसींचे नेते असलेल्या जेष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याचा सूर ओबीसींच्या गटातून येत आहे.
राज्यात मराठा आंदोलन तीव्र झाले. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी प्रखर होताच, छगन भुजबळ मैदानात उतरले. त्यांनी ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्यात ओबीसी परिषद आणि सभा घेतल्या. राज्यात मराठा आणि ओबीसी असे ध्रुवीकरण झाले. छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली. यापूर्वीच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महत्त्वाचे खाते होते. महायुतीच्या सध्याच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागेल अशी अखेरपर्यंत त्यांच्या समर्थकांना आशा होती. पण त्यांचा पत्ता कट झाला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या यादीत त्यांना डच्चू देण्यात आला. या कॅबिनेटमध्ये त्यांना डच्चू देण्यात आल्याने 33 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या नागपूर येथील शपथविधीची चर्चा होत आहे.
राष्ट्रवादीकडून आतापर्यंत सात मंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नावच नाही. त्यामुळे त्यांना डच्चू देण्यात आले.तसेच धनंजय मुंडे यांचे देखील नाव जाहीर झाले नव्हते. मात्र, ऐनवेळी धनंजय मुंडे यांचे नाव अजित पवारांनी निश्चित केले.तसेच मंत्र्यांच्या यादीत दिलीप वळसे, धर्मराव अत्राम,अनिल पाटील यांनांही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. मंत्री ठरवायचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.मात्र ओबीसीमध्ये मराठा उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी भुजबळाचा मुख्यमंत्री फडणवीसांसोबत राजकीय गेम केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
21 डिसेंबर 1991 रोजी राज्याची उपराजधानी नागपूरात तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ हे कॅबीनेट मंत्री म्हणून सहभागी झाले होते. नागपूरमध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता.त्यानंतर ३३ वर्षांनी आज १५ डिसेंबर २०२४ ला नागपूरमधील राजभवनात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र त्यांना डावलण्यात आले. त्यांच्यासोबत राजेंद्र गोडे, भरत बाहेकर, जयदत्त क्षीरसागर, शालिनी बोरसे, वसुधा देशमुख, शंकर नम या सहा जणांनी उपमंत्री म्हणून शपथ घेतली होती. नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना भुजबळ यांनी 11 सहकाऱ्यांसह शिवसेनेला भगदाड पाडले होते.