बिहारमध्ये चकमकीत 10 जवान शहीद, 4 नक्षलवाद्यांचा खात्मा

0
33

पाटणा, दि. 19 – नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 10 जवान शहीद झाले असून 4 नक्षलाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. औरंगाबाद आणि गया जिल्ह्याच्या सीमारेषेवर डुमरी नाला जंगल परिसरात दिवसभर ही चकमक सुरु होती. सोमवारी सुरु झालेल्या चकमकीत 17 सुरुंग स्फोटही घडवण्यात आले.

जखमी जवानांना घटनास्थळावरुन सुरक्षित परत आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. मात्र अजूनपर्यंत कोणाला परत आणण्यात यश मिळालेलं नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात फायरिंग केली जात असल्याने हेलिकॉप्टर उतरवणं शक्य होत नाही आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर पुन्हा पाटणा येथे परत आले आहे.

‘आम्हाला 2 दिवसांपुर्वी नक्षलवाद्यांचा एक गट या ठिकाणी हालचाल करत असल्याची माहिती मिळाली होती. सोमवारी नक्षलवाद्यांनी अचानक सुरुंग स्फोट करण्यास सुरुवात केली त्यामुळे आत जंगलात गेलेली सुरक्षा पथकं अडकली. स्फोटानंतर जवानांनी फायरिंग करण्यास सुरुवात केली’, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.