‘डीएचओ’ विरोधात महिला डॉक्टर शहर पोलीस ठाण्यात

0
7

यवतमाळ,दि.19 : महिला वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अडचणींचा फायदा घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी घरी बोलावितात, कोणत्या ना कोणत्या कारणावरून कारवाईचा बडगा उभारला जातो, अशी तक्रार घेऊन तीन महिला वैद्यकीय अधिकारी आपल्या काही सहकारी मित्रासोबत सोमवारी थेट यवतमाळ शहर ठाण्यात धडकल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली.
जिल्हा आरोग्य अधिकार्‍याकडून आक्षेपार्ह वागणूक मिळत असल्याची तक्रार तीन महिला वैद्यकीय अधिकारी आणि पाच कंत्राटी नर्सेसने शहर ठाण्यात केली. या तक्रारीत डॉ.राठोड महिला अधिकारी आणि कर्मचार्‍यांना घरी भेटण्यासाठी बोलावितात, तसा निरोप तालुका वैद्यकीय अधिकार्‍याकडून दिला जातो. घरी भेटण्यास गेले नाही तर कोणत्या ना कोणत्या कारणाने कारवाई केली जाते, वारंवार कारणेदाखवा नोटीस बजावून दबाव निर्माण करतात, रजेवर गेल्यानंतरही स्पष्टीकरण मागतात असे या तक्रारीत नमूद आहे. तसेच बैठकींमध्ये महिला कर्मचार्‍यांना एकेरी शब्दाचा प्रयोग करून जाणीवपूर्वक अपमान केला जातो. अडचणीत आणण्यासाठी तेथील कर्मचारी काढून प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठविले जातात, याचा जाब विचारला तर पदाधिकार्‍यांवर कारवाई केली जाते, असे या तक्रारीत म्हटले आहे.
शहर पोलीस ठाण्यात राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. धर्मेश चव्हाण, नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे वाय.एम.सय्यद आदी उपस्थित होते.

हे बदनाम करण्याचे षडयंत्र असून महिला वैद्यकीय अधिकार्‍यांनी विशाखा समितीकडे कोणतीच तक्रार केली नाही. कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांवर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निर्देशावरुन कारवाई केली. हा प्रकार केवळ खोटे आरोप करून दडपशाही तंत्राचा वापर केला जात आहे.
-डॉ.के.झेड. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी