मनमोहन सिंग 92 वर्षांचे असून त्यांची प्रकृती खालावल्याचं डॉक्टरांनी दाखल करण्यात आले होते त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
22 मे 2004 रोजी मनमोहन सिंग हे देशाचे 13 वे पंतप्रधान बनले होते. त्यानंतर ते सलग दहा वर्षं देशाचे पंतप्रधान राहिले.
केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान. डॉ सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रवास हा थक्क करणारा आहे.
रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास, फाळणीनंतर घर सोडलं
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाह या गावात मनमोहन यांचा जन्म झाला. दिवस होता 26 सप्टेंबर आणि वर्ष 1932.
मनमोहन लहान असतानाच त्यांची आई वारली. तेव्हा मनमोहन केवळ काही महिन्यांचे होते. वडील कामानिमित्त सतत बाहेर असायचे. तेव्हा ते त्यांच्या काकांकडे राहायला गेले. तिथे आजीने त्यांची चांगली काळजी घेतली, असं ज्येष्ठ पत्रकार आणि एकेकाळचे डॉ. सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारू यांनी त्यांच्या The Accidental Prime Minister या पुस्तकात नमूद केलं आहे.
त्यांच्या जन्मगावी शाळा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र नव्हतं. मनमोहन यांना उर्दू माध्यमाच्या शाळेत जाण्यासाठी रोज अनेक मैल पायपीट करावी लागायची.
गावात वीज पोहोचली नव्हती. तेव्हा मनमोहन यांनी रात्री रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास केला.
लहानपणापासूनच ते चिकाटीनं अभ्यास करायचे. स्वभावाने शांत असलेले मनमोहन अभ्यासात मात्र फार हुशार होते.
Getty Images
“1947च्या फाळणीनंतर मनमोहन कुटुंबियांसोबत पाकिस्तानमधून भारतात पोहोचले. आल्यानंतर ते पहिल्यांदा हल्द्वानी (उत्तराखंड) येथे निर्वासित छावणीत राहिले. फाळणीच्या तणावामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये असताना बोर्डाची परीक्षा देता आली नाही. त्यामुळे भारतात आल्यावर सिंग यांनी बोर्डाची परीक्षा दिली. तसंच पंजाब विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले,” असं ज्येष्ठ पत्रकार मानिनी चटर्जी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
डॉ. सिंग 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्याला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये बालपणीच्या काही आठवणी सांगितल्याचं चटर्जी यांनी सांगितलं.
भारतात आल्यावरही सिंग यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. निर्वासित छावणीनंतर ते अमृतसर, पटियाला, होशियारपूर आणि चंदीगडला राहिले.
घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. तरीही डॉ सिंग यांनी पंजाब विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन अर्थशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेतलं. यामागे एक महत्त्वाचं कारण होतं. ते म्हणजे त्यांना शिक्षणासाठी मिळालेली स्कॉलरशिप.
Getty Images
“केंब्रिज किंवा ऑक्सफर्डमध्ये जाऊन शिकायची माझी परिस्थितीच नव्हती. पण भारतात आल्यावर मी चांगला अभ्यास केला. सोबत नशिबानेही साथ दिली आणि मी स्कॉलरशिप मिळवल्या.” डॉ मनमोहन सिंग यांनी अमेरिकन पत्रकार चार्ली रोज यांना दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे.
डॉ. सिंग सप्टेंबर 2004मध्ये UNGAच्या आमसभेसाठी अमेरिकेत गेले असताना त्यांनी ही मुलाखत दिली होती.
‘भारत देश गरीब का आहे? हे समजून घेण्यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला, असंही सिंग यांनी एकदा सांगितलं होतं.
पण गरीब घरातून पुढे आलेले डॉ. सिंग मात्र भांडवलशाहीचे पुरस्कर्ते आहेत. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भांडवलशाहीची गरज असल्याचं त्यांचं मत आहे.
1991मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना देशाची अर्थव्यवस्था डॉ. सिंग यांनी जगासाठी खुली केली आणि देशात उदारमतवादाचं वारं वाहू लागलं.
याविषयी पत्रकार चार्ली रोजी यांनी सिंग यांना विचारलं की “तुम्ही एवढ्या हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आला. तरीही तुमचा भांडवलशाही आणि मुक्त बाजारपेठेवर एवढा विश्वास का आहे? भारतात गरिबी आणि असमानता मोठ्या प्रमाणात आहे. ती सुधारण्यासाठी समाजवाद आणि नियोजनबद्ध अर्थव्यवस्था यांचा तुम्ही स्वीकार का केला नाही?”
तेव्हा डॉ. सिंग म्हणाले, ” आर्थिक समानता ही एक अशी गोष्ट आहे ज्याची आम्हाला सतत चिंता वाटत आहे. पण माझ्यामते भांडवलशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात गतीशिलता (Dynamism) दिसून आली आहे. त्यामुळे गरीबी दूर करण्यासाठी मदत होऊ शकते.”
मनमोहन सिंह राजकारणात कसे आले?
1991 मध्ये नरसिंह राव यांचं राजकीय करिअर जवळपास संपलं होतं. रोजर्स रिमूव्ह कंपनीचा ट्रक त्यांच्या पुस्तकांची 45 खोकी घेऊन हैदराबादला रवाना झाला होता.
मात्र त्यावेळी नरसिंह राव यांना त्यांच्या एका मित्रानं ही पुस्तकं इथंच ठेवा, असा सल्ला दिला होता. ते प्रशासनात बडे अधिकारी होते. आणि हौशी ज्योतिषीही. त्यांनी नरसिंह रावांना सांगितलं होतं, की माझ्या अंदाजानुसार तुम्ही पुन्हा दिल्लीत येणार आहात. त्यामुळे ही पुस्तकं इथेच राहू द्या.
विनय सीतापती आपल्या ‘हाफ लायन- हाऊ पी. व्ही. नरसिंह राव ट्रान्सफॉर्म्ड इंडिया’ या पुस्तकात लिहितात की “राव रिटायरमेंट मोडमध्ये गेले होते. त्यांनी दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. कधी दिल्लीत यावं लागलं तर राहण्याची अडचण होऊ नये, हा त्यामागे हेतू होता.”
मात्र काहीच दिवसात सगळं चित्र पालटलं. 21 मे 1991 या दिवशी श्रीपेरंबदूरमध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. या घटनेनंतर बीबीसीचे पत्रकार परवेज आलम यांनी जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना दूरदूरपर्यंत असं वाटलं नव्हतं की राव पुढच्या काही दिवसांत देशाचे पंतप्रधान होणार आहेत.
ANIमनमोहन सिंग
नटवर सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जेव्हा राजीव यांच्या हत्येनंतर विदेशी नेते आणि पाहुणे सोनियांना भेटून परतले त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचे माजी मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांना 10 जनपथला बोलावून घेतलं. आणि काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोण योग्य व्यक्ती आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी हक्सर यांनी तत्कालीन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाची शिफारस केली.
शंकर दयाळ शर्मांचं मन वळवण्याची जबाबदारी नटवर सिंह आणि अरुणा असफ अली यांच्यावर होती. शर्मांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. सोनियांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास हा आपला सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलं.
पण “भारताच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी हे पूर्णवेळ काम आहे. माझं वय आणि प्रकृती पाहता देशातील सर्वांत मोठ्या पदाला मी न्याय देऊ शकेन असं वाटत नाही” असं शर्मांनी स्पष्ट केलं.
नटवर सिंह आणि अरुणा असफ अलींनी शंकर दयाळ शर्मांचं म्हणणं सोनियांच्या कानावर घातलं. सोनियांनी पुन्हा पी. एन. हक्सर यांना बोलावून घेतलं. आणि यावेळी हक्सर यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांचं नाव पुढे केलं. त्यानंतर जे घडलं तो केवळ इतिहास आहे.
नरसिंह राव राजकीय खाचखळग्यातून मार्ग काढत देशातील सर्वोच्च पदावर पोहोचले होते. कुठल्याही पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी राजकीय पॅराशूटचा उपयोग केला नाही. राव यांचं भारतासाठी सगळ्यांत मोठं योगदान होतं, ते डॉ.मनमोहन सिंग यांचा शोध.
अलेक्झांडर यांनी सुचवलं मनमोहन यांचं नाव
विनय सीतापती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की “जेव्हा नरसिंह राव पंतप्रधानपदावर विराजमान झाले, तेव्हा ते बऱ्याच विषयात तज्ज्ञ झाले होते. आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय त्यांनी आधीच सांभाळलं होतं. भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. पण अर्थ खात्यात त्यांना विशेष गती नव्हती. पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी दोन दिवस कॅबिनेट सचिव नरेश चंद्रा यांनी राव यांना आठ पानी नोट सोपवली. ज्यात भारताची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचं म्हटलं होतं.”
सीतापती पुढे सांगतात, “राव यांना असा एक मुखवटा हवा होता, जो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि पक्षांतर्गत विरोधकांना हे पटवून देईल, की भारत आता जुन्या अर्थधोरणानं तगणार नाही. त्यावेळी पी. सी. अलेक्झांडर राव यांच्या निकट होते. राव यांनी अलेक्झांडर यांना विचारलं की तुम्हाला असा एखादा अर्थतज्ज्ञ माहिती आहे का, ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे. अलेक्झांडर यांनी तात्काळ रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक आय. जी. पटेल यांचं नाव सुचवलं.”
सीतापती यांच्या माहितीनुसार “आय. जी. पटेल यांना दिल्लीला यायचं नव्हतं. त्यांची आई आजारी होती. त्यावेळी ते बडोद्यात राहत होते. त्यामुळे अलेक्झांडर यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं. अलेक्झांडर यांनी शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधी डॉ. सिंग यांना फोन केला. त्यावेळी ते परदेशातून परतले होते आणि घरी विश्रांती घेत होते. त्यांना झोपेतून उठवण्यात आलं. आणि राव यांचा प्रस्ताव सांगण्यात आला. पण डॉ. मनमोहन सिंग यांना त्यावर विश्वास बसला नाही.”
Getty Images
“दुसऱ्या दिवशी शपथग्रहण सोहळ्याआधी अवघे तीन तास यूजीसीच्या कार्यालयात मनमोहन सिंग यांना स्वत: नरसिंह राव यांनी फोन केला. राव यांनी मनमोहन यांना अर्थमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र त्याचवेळी आपली आर्थिक नीती यशस्वी झाली, तर श्रेय आपल्या दोघांना मिळेल, पण त्यात अपयश आलं तर तुम्हाला पदावरून जावं लागेल, असं स्पष्ट सांगितलं”
सीतापती सांगतात की 1991 च्या अर्थसंकल्पाआधी दोन आठवडे मनमोहन सिंग मसुदा घेऊन पंतप्रधान नरसिंह रावांकडे गेले. डॉ. सिंग यांचा मसुदा राव यांनी फेटाळून लावला. “हेच करायचं होतं, तर मग मी तुमची निवड कशाला केली?” असा संतप्त सवालही राव यांनी केला.
आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणाला डॉ. मनमोहन सिंग यांनी “ज्या विचारांची वेळ आली आहे, त्याला जगातली कुठलीही ताकद रोखू शकत नाही,” या व्हिक्टर ह्यूगोच्या ओळींनी सुरुवात केली.
आपल्या भाषणात त्यांनी वारंवार राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि नेहरुंचा उल्लेख केला. पण त्यांच्या आर्थिक धोरणांच्या बरोबर उलट पावलं उचलण्यात डॉ. मनमोहन सिंग यांनी कधीच हयगय केली नाही