भंडारा : येथील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत ब्राईड बार विभागात क्रेनची पुली पडल्यामुळे दोन मजूर गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सकाळी ११ वाजता दरम्यान घडली.जवाहर नगर येथील आयुध निर्माणतील घटनेचे व्रण ताजे असताना सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत घडलेल्या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
कंपनीच्या ब्राईड बार विभागात क्रेनने काम सुरू असताना अचानक क्रेनचा वायर तुटला आणि पुली खाली पडली . त्याच वेळी त्या विभागात काम करीत असलेल्या एका मजुराच्या डोक्यावर आणि नंतर पायावर पुली पडली तर दुसऱ्या मजुराच्या पायावर पडल्याने तोही गंभीर रित्या जखमी झाला.रक्तबंबाळ अवस्थेत या दोघांना रुग्णालयात हलविण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आशिष लिल्हारे आणि बादल झंझाड अशी जखमींची नावे असून या दोघांवर भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आशिष लिल्हारे हा कंत्राटी कामगार असून बादल झंझाड हा मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत लागलेला असून सहा महिन्यासाठी तो कंपनीत कामासाठी लागलेला होता.