जळगाव,दि.१६:-:-जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असते अशा पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना चोपडा तालुक्यात मध्य प्रदेश सीमेवर घडली. उमर्टी गावातून या पोलिसाचे अपहरण करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वेगाने पावले उचलत अपहरण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याची सुटका केली.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर दोन उमर्टी गावे आहेत. यातील एक गाव हे महाराष्ट्रात तर दुसरे गाव हे सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे. चोपडा ग्रामीण पोलीस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काही जणांनी पोलिसांवर हल्ला केला. व एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करत त्याला मध्य प्रदेशात असलेल्या उमर्टी गावात नेले.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी तातडीने पथकाची स्थापना करून मध्यप्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांचा मोठा फौज फाटा हा उमर्टी गावाकडे रवाना झाला. तब्बल चार तासानंतर अपह्रत पोलिस कर्मचाऱ्याची सुटका करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांची मोठी कारवाई होण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी अपह्रत पोलिस कर्मचाऱ्यास पोलिसांच्या स्वाधीन केले अशी माहिती जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. मात्र, या घटनेनं पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांचेच अपहरण होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.