राज्यात १४ खाणी सुरू करून महसूल वाढवण्यावर भर देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
32
*केंद्र शासनाकडून खनिकर्म विभागाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल-केंद्रीय खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी
मुंबई, दि.२८ : केंद्र शासनाच्या धर्तीवर खनिकर्म विभागाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. राज्यातील खाणपट्टे सुरु करावेत अशी सूचना केंद्रीय खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केली.राज्यातील खनिकर्म विभागासाठी लागणारे पर्यावरण, महसूल, भूसंपादन व वन विभागातील प्रलंबित कामे फास्ट ट्रॅक वर घेवून राज्यात १४ खाणी सुरू करून महसूल वाढवण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यातील प्रमुख खाणपट्टे सुरू होवून राज्याला महसूल प्राप्त होण्यासाठी आयोजित बैठकीत केंद्रीय खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे खनीकर्म मंत्री शंभूराज देसाई, केंद्रीय खनीकर्म सचिव व्हीं. एल.कांथा राव, खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ, उपमहाव्यवस्थापक डॉ. टी.के. राव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते .
केंद्रीय खनिकर्म मंत्री जी.किशन रेड्डी म्हणाले की,राज्य सरकारने खाणपट्टे सुरू करण्याबाबत राज्यस्तरावर खाण, वन, पर्यावरण आणि महसूल विभागांमधील समन्वयासाठी यंत्रणा तयार करा. महाराष्ट्र ही स्ट्रार्टअपची राजधानी खनिकर्म क्षेत्रातील स्टार्टअप ला प्रोत्साहन देणारे धोरण ठरवारे असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या आर्थिक विकासासाठी खनिजे अत्यंत आवश्यक असल्याने राज्यातील खाणपट्टे प्रगतीबाबत शासन प्राधान्याने विचार करत आहे.भूवैज्ञानिक अहवालांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे, खाणपट्टे लिलाव प्रक्रियेमध्ये व इतर कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र अभ्यासाचा (AI/ML) अधिकाधिक वापर करणे, महसूल विभागाकडे उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देणे, ज्या खाणी कार्यरत नाहीत अथवा कालबाह्य झालेल्या आहेत त्यांचे विश्लेषण करणे,राज्य खाण निर्देशांकाची आणि राज्य खनिज शोध ट्रस्ट (SMET) स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. राष्ट्रीय खाण विकास निधी (NCMM) मिळवण्यासाठी स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वाढवण बंदराच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वाळू लागणार आहे त्यासाठी केंद्र शासनाकडून ‘हेतू पत्र’ जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधीकरणचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांना यावेळी वितरण करण्यात आले.
केंद्रीय सचिव व्ही. एल. कांथा राव यांनी हॉटेल ताज येथे खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांशी व राज्य शासनाच्या पर्यावरण,वने,महसूल या विभागातील अधिका-यांशी झालेली चर्चा व राज्याच्या बलस्थानांविषयी चर्चा केली.