आमदाराने पोलीस कर्मचार्‍याच्या थोबाडीत हाणली

0
16

तुमसर दि.18 : भाजपतर्फे आयोजित तिरंगा रॅलीचा समारोपीय कार्यक्रमादरम्यान (एका भाजप कार्यकर्त्याला) वाहनचालकाला मारहाण केल्याप्रकरणी संतापलेले भंडार्‍याचे आमदार अँड.रामचंद्र अवसरे यांनी पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचार्‍याच्या थोबाडीत हाणली. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणाने तुमसर पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला आणि तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७0 व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपतर्फे ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. लाखांदूर येथून सुरुवात झालेल्या या रॅलीचा समारोप तुमसर येथे सायंकाळी झाला. दरम्यान रात्री ८ वाजताच्या सुमारास रॅलीच्या समारोप प्रसंगी रस्त्याच्या बाजूला चारचाकी वाहन उभे करून वाहनचालक कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिपिंग करीत होता. ही बाब पोलीस कर्मचारी राजू साठवणे यांना खटकली. साठवणे यांनी सदर वाहनचालकाला हटकले व पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्या कानशिलात हाणली. तसेच तंबी देऊन वाहन अन्यत्र हलविण्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार वाहनचालक कार्यकर्त्यांनी आमदार अँड.अवसरे यांना सांगितला.
माहिती मिळताच आमदार अवसरे संताप व्यक्त करीत तुमसर पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस कर्मचारी राजू साठवण याला बोलावून त्याच्या थोबाडीत हाणली. आमदारांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेवर सारेच अचंबित झाले. ही वार्ता शहरात वार्‍यासारछी पसरली.दरम्यान, पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे यांनी मध्यस्थी करून आमदारांची समजूत घातली.
वृत्त लिहिपर्यंत पोलीस कर्मचारी साठवणे यांच्या तक्रारीवरून आमदार अँड. अवसरे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे यांनी दिली.