‘जय’ बेपत्ताप्रकरण : ‘त्या’ दोघांची जामिनावर सुटका

0
9

गोंदिया,दि.18 : नागझिरा अभयारण्यात जन्मलेल्या ‘जय’ नामक वाघाच्या शिकारीच्या संशयावरुन मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची पवनी न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. परंतु चौकशीदरम्यान दोघांची गरज भासल्यास वनविभाग त्यांना पाचारण करणार आहे. वनविभागाच्या चमूने पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील किसन इस्तारी सर्मथ व मधुकर मुरलीधर हटवार या दोघांना ताब्यात घेतले होते. बुधवारी दोघांनाही पवनी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
उमरेड कर्‍हांडला अभयारण्यातील ‘जय’ चार महिन्यांपासून बेपत्ता झाल्याच्या चर्चेने वनविभागाची झोप उडाली आहे. त्याचा शोध घेत असतानाच त्याची शिकार झाल्याची निनावी तक्रार प्राप्त झाली होती. चर्चेअंती दोघांवर संशय असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. दोघांचीही सखोल चौकशी करण्यात आली, परंतु ‘जय’ च्या संदर्भात कुठलाही ठोस संबंध त्यांच्या बयाणाशी जुळत नसल्याची बाब स्पष्ट झाली. कारवाईदरम्यान किसन सर्मथ याच्या घरी २0 फासे व लांब टोक असलेली लोखंडी तुतारी आढळली होती.दोघांवर वन्यप्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक उपवनसंरक्षक आर.डी. चोपकर यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्राधिकारी डी.एन.बारई करीत आहेत.