
मुंबई:-सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) वसई, विरारमधील वास्तुविषारद (आर्किटेक्ट) आणि पालिका अभियंत्यांच्या निवासस्थानी छापे टाकले असून सोमवारी सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. नालासोपारामधील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात पालिकेचे माजी नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांच्यावरील कारवाईत मिळालेल्या माहितीनंतर हे छापे टाकण्यात आले आहेत. वसई आणि मुंबईतील १२ ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे वसई, विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सक्त वसुली संचलनालायने (ईडी) १४ मे रोजी वसई, विरार महापालिकेचे माजी नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानासह वसई, विरारमधील १३ ठिकाणी छापे टाकले होते. यावेळी रेड्डी यांच्या घरातून ३२ कोटी रुपयांचे सोने आणि रोकड जप्त केली होती. रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आली कुठून त्याचा ईडी तपास करीत होती. त्या माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
सक्त वसुली संचलनालायने (ईडी) सोमवारी अचानक या प्रकरणाशी संबंधित वास्तुविषारद आणि नगररचना (टाऊन प्लानिंग) विभागातील अभियंत्याच्या घरी छापे टाकले. वसई आणि मुंबईतील १२ ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. या कारवाईचा अधिकृत तपशील अद्याप ईडीकडून जाहीर करण्यात आलेला नाही. इमारतींंना परवानी देण्यासाठी वास्तुविषारदांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केला जात असल्याचा आरोप आहे. रोख रकमेऐवजी सोन्याच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आल्याची चर्चा आहे. रेड्डी यांच्यावरील कारवाईनतंर अनेक वास्तुविषारद परदेशात निघून गेले होते. मात्र प्रकरण निवळल्याचे समजून ते परतले होते.
काय आहे प्रकरण ?
नालासोपारा पूर्व परिसरातील अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर आता सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याने या अनधिकृत इमारती बांधल्या होत्या. याप्रकरणात महापालिकेचे अधिकारी आणि नगररनचा उपसंचालक वाय. एस. रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे केली होती. येथील रहिवाशांना बेघर करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असून त्याची चौकशी करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाची चौकशी करीत होती.
ईडीच्या पथकाने १४ मे रोजी वसई, विरार शहरासह १३ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून चौकशी सुरू केली होती. याचदरम्यान वसई, विरार महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या मूळ हैदराबाद येथील निवासस्थानीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती. या कारवाई रेड्डी यांच्या घरातून सुमारे ८ कोटी ६ लाख रुपये रोख रक्कम आणि २३ कोटी २५ लाख रुपयांचे हिरे जडित दागिने आणि सोने जप्त करण्यात आले. याशिवाय विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली.