बाळासाहेबांच्या फोटोसमोर ठाकरे बंधुंची भेट;
उध्दव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात सुमारे २५ मिनिटे झाली चर्चा
मुंबई:-राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यांनी उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. मराठी मेळाव्यात दोन्ही बंधू एकत्र आले होते. त्यानंतर आज राज यांनी मातोश्री गाठले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले. दरम्यान, ठाकरे बंधूंचा मातोश्रीतला पहिला फोटो समोर आला आहे.
त्रिभाषा सूत्री सक्तीचा जीआरचा निर्णय मागे घेतल्यानंतर मराठी विजय मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जवळपास 20 वर्षानंतर राजकीय मंचावर पहिल्यांदाच एकत्र आले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी उसळली आहे. त्यातच आज राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जात उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून, सकाळपासूनच विविध पक्षांचे कार्यकर्ते, नेते, आणि समर्थक शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर गर्दी करत होते. याच दरम्यान, दुपारी 12-12.30 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर दाखल झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काही मिनिटांपर्यंत दोघांमध्ये चर्चाही झाली. उद्धव आणि राज यांच्यात मातोश्री बंगल्यात जवळपास 25 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांचा पहिला फोटो समोर आला. या फोटोमध्ये उद्धव आणि राज हे सोबत दिसत असून त्यांच्या मागे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे.





