
मुंबई : तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेलंगणाच्या राज्यपालपदी हिमाचल प्रदेशची जबाबदारी असलेल्या शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नावाची घोषणा केली. ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिष्णू देव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेले जिष्णू देव वर्मा हे भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. 2018 ते 2023 या कालावधीत त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याच्या वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती.जिष्णू देव वर्मा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. 1990 च्या दशकात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सक्रिय राजकारण सुरू केले.
त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. 1996, 1998 आणि 1999 मध्ये त्यांनी त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.2018 मध्ये त्रिपुरात भाजप सत्तेत आल्यानंतर जिष्णू देव वर्मा यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या काळात त्यांनी वित्त, ऊर्जा, नियोजन, पंचायत राज आणि ग्रामीण विकास यांसारख्या विभागांचे नेतृत्व केले.
2018 ते 2023 या कालावधीत त्रिपुराच्या प्रशासनात जिष्णू देव वर्मा यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आर्थिक नियोजन, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यावर त्यांनी भर दिला. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्रिपुराच्या विकास प्रक्रियेत त्यांच्या नेतृत्वाची नोंद घेतली जाते.
: राज्यपालपदापर्यंतचा प्रवास
राजकारणातील दीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. आधी त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात त्यांची नियुक्ती ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.
साहित्य आणि कलेची आवड
राजकारणाबरोबरच जिष्णू देव वर्मा यांना साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्राचीही आवड आहे. ते कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. याशिवाय ते बॅडमिंटन खेळाशीही जोडलेले असून क्रीडा संघटनांमध्ये त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली आहे.





