34.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News नागपूरचा सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर आसाममध्ये शहीद

नागपूरचा सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर आसाममध्ये शहीद

0
109

blank

नागपूर : आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी भारतीय हवाई दलाचे सुखोई Su-30MKI लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने दोन धाडसी वैमानिक शहीद झाले. यात नागपूरचा सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पूर्वेश दुरुगकर यांनी यापूर्वी वायुसेनेच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्येही महत्त्वाची भूमिका बजावत देशाच्या संरक्षणासाठी योगदान दिले होते, अशी माहिती त्यांचे वडील रविंद्र दुरुगकर यांनी दिली.
या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर या दोन वैमानिकांना वीरमरण आले. भारतीय हवाई दलाचे हे रशियन बनावटीचे Su-30MKI लढाऊ विमान आसाममधील जोरहाट एअरबेसवरून नियमित प्रशिक्षण मोहिमेसाठी उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचा रडार आणि रेडिओ संपर्क तुटल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रात्री सुमारे ७:४२ वाजता विमानाशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेनंतर कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातस्थळ हे जोरहाटपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शहीद पूर्वेश दुरुगकर यांचे वडील रविंद्र दुरुगकर यांनी माध्यमांशी बोलताना मुलाच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला. “पूर्वेशने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही वायुसेनेच्या विमानातून देशाच्या संरक्षणासाठी मोठी भूमिका बजावली होती. मात्र देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव तो अनेक गोष्टी आम्हाला सांगत नसे. त्याच्या कामाबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही. त्याच्या जाण्याने नक्कीच दुःख झाले आहे, पण त्याचबरोबर आम्हाला त्याचा प्रचंड अभिमानही आहे,” असे ते भावुक होत म्हणाले.
पूर्वेश दुरुगकर हे मूळचे नागपूरचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शहरात शोककळा पसरली असून त्यांच्या घरी नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या तरुण वैमानिकाला नागपूरकरांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
पूर्वेश यांनी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून संगणक विज्ञान विषयात बी.एस्सी. पदवी पूर्ण केली होती. लहानपणापासूनच त्यांना भारतीय हवाई दलात जाण्याची तीव्र इच्छा होती. महाविद्यालयीन काळात त्यांनी राष्ट्रीय छात्र सेना (NCC) मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. महाराष्ट्र संचलनालयाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी सहा राष्ट्रीय NCC शिबिरांमध्ये सहभाग घेतला होता. तसेच एरो मॉडेलिंग स्पर्धांमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.
लढाऊ वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी AFCAT परीक्षा उत्तीर्ण केली आणि सप्टेंबर 2021 मध्ये हैदराबाद येथील एअर फोर्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. कठोर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून दाखल झाले. त्यांचे वडील रविंद्र दुरुगकर हे सेंट्रल रेल्वेमधून सेवानिवृत्त झाले असून आई संध्या दुरुगकर या गृहिणी आहेत. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या शूर पुत्राच्या बलिदानामुळे संपूर्ण नागपूरकरांना अभिमान वाटत असला तरी त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.