
अर्जुनी-मोर. -तालुक्यातील कोहलगाव येथील २३ वर्षीय तरुण विलास शंकर सोनवाने गाय वाचवण्याच्या प्रयत्नात तलावात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच त्याचा वाढदिवस असल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास शंकर सोनवाने (वय २३, रा. कोहलगाव) हा नेहमीप्रमाणे आज दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास घरून गाय-म्हशी चरायला घेऊन गेला होता. गावालगत असलेल्या मामा तलावावर तो जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेला. यावेळी त्याच्या गाईंपैकी एक गाय पाण्याच्या आतमध्ये जास्त पुढे गेल्याने तिला बाहेर काढण्यासाठी विलास तलावात उतरला.मात्र तलावातील पाण्याचा खोल अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि दुर्दैवाने बुडाला.घटनेची माहिती मिळताच नवेगाव बांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून पोलीस व स्थानिकांच्या मदतीने तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. तलावात शोधकार्य सुरू असून मृतदेह मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.





