गोंदिया : भगवान श्री जगन्नाथांच्या विश्वविख्यात रथयात्रेचे आकर्षण देशभरातील भाविकांना दरवर्षी पुरीकडे खेचून नेते. श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा अद्वितीय संगम असलेल्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने विदर्भ, छत्तीसगड तसेच गोंदिया जिल्ह्यात वास्तव्यास असलेले ओडिशा राज्यातील नागरिक दरवर्षी पुरीकडे प्रस्थान करतात. यंदा या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गोंदिया–पुरी–गोंदिया दरम्यान विशेष ‘रथयात्रा स्पेशल’ रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, भाविकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरली आहे.
गोंदिया जिल्ह्यात ओडिशातील अनेक कुटुंबे रोजगार, व्यवसाय आणि उद्योगाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यामुळे भगवान जगन्नाथांविषयी त्यांची असलेली अपार श्रद्धा लक्षात घेता ही विशेष रेल्वे त्यांच्या भावविश्वाला जणू रेल्वेच्या रुळांवरून पुरीच्या पवित्र धामाशी जोडणारा भक्तीचा सेतू ठरणार आहे.
२ जुलै पासून चार फेरी
रेल्वे प्रशासनाने चार-चार फेऱ्यांचे नियोजन केले आहे. गाडी क्रमांक ०८८०१ गोंदिया–पुरी रथयात्रा स्पेशल ही २, ९, १६ आणि २९ जुलै रोजी गोंदियाहून दुपारी १.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पुरी येथे पोहोचणार आहे. तर ०८८०२ पुरी–गोंदिया स्पेशल ३, १०, १७ आणि ३० जुलै रोजी पुरीहून दुपारी १ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता गोंदियात दाखल होणार आहे.





