ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना (शिंदे) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि तीन महिला नर्सना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला आहे. याप्रकरणातील आरोपींवर 18 तास उलटूनही गुन्हा दाखल करण्यात नसल्यानं डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये लोकप्रतिनिधींच्या मुजोरीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे (शिंदे) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून एका महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि तीन नर्स यांना मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेदरम्यान नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनाही पकडून ठेवल्याचा आरोप आहे. या जीवघेण्या हल्ल्यानंतर रुग्णालयातील नर्स आणि कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले असून, “आमच्यावर आणखी किती अन्याय करणार?” अशी संतप्त आणि आर्त भावना त्यांनी व्यक्त केली.
काय आहे प्रकरण? : रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी रात्री आठच्या दरम्यान दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांना पूर्वकल्पना दिली की, जन्मानंतर बाळाला ‘एनआयसीयू’ (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) उपचारांची आवश्यकता भासू शकते. विशेष म्हणजे शास्त्रीनगर रुग्णालयातील सर्व एनआयसीयू बेड्स आधीच भरलेले असल्यानं, बाळाच्या सुरक्षेसाठी संबंधित महिलेला तातडीनं दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा प्रामाणिक सल्ला डॉक्टरांनी दिला. याच कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचं रुपांतर पुढे थेट डॉक्टर आणि नर्सवरील हल्ल्यात झालं.
डॉक्टर-कर्मचाऱ्यांचं रुग्णालयात कामबंद आंदोलन : मारहाणीच्या घटनेनंतर शास्त्रीनगर रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध म्हणून सर्व डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं ‘कामबंद आंदोलन’ सुरू केलं आहे. “यापूर्वीही अनेकदा डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील नर्ससोबत अशा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. अशा असुरक्षित वातावरणात डॉक्टरांची काम करण्याची मनस्थिती राहिलेली नाही,” अशी भावना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी दोषींवर तत्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.




