26.8 C
Gondiā
Tuesday, July 7, 2026
Home विदर्भ नगरपरिषदेच्या टॅक्स विभागाचा स्लॅब कोसळला

नगरपरिषदेच्या टॅक्स विभागाचा स्लॅब कोसळला

0
15

गोंदिया : पावसाळा सुरू होताच जीर्ण इमारती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशातच गोंदिया शहरातील नगरपरिषदेच्या इमारतीतील टॅक्स विभागाचा स्लॅब आज (7 जुलै) मंगळवारी अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं त्यावेळी तिथं कोणताही कर्मचारी किंवा नागरिक उपस्थित नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळं नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह टॅक्स भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गोंदिया नगरपरिषदेची मुख्य इमारत गेली अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. पावसाळ्यात गळती, भिंतींना तडे आणि आता स्लॅब कोसळण्याच्या घटना होत आहेत. तरीही नगरपरिषदेचे अनेक महत्त्वाचे विभाग आजही याच धोकादायक इमारतीतून सुरू आहेत.blank

कर्मचारी आणि नागरिक दोघांमध्येही भीतीचं वातावरण : आज सकाळी टॅक्स विभागाचं काम सुरू होण्यापूर्वी स्लॅबचा काही भाग कोसळला. या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आपला जीव मुठीत धरून दररोज काम करत आहेत. टॅक्स भरण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना आता या इमारतीत पाय ठेवायला भीती वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे की, जीवाला धोका असलेल्या या इमारतीतून टॅक्स विभाग तातडीनं दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा.काही दिवसांपूर्वीच नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी भुनेश्वरी झलके यांच्या केबिनमधील खिडकीचा भाग कोसळला होता. त्यांनी याबाबत मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना लेखी तक्रार दिली होती. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी दुसऱ्याच दिवशी नगरपरिषदेचे अनेक विभाग स्टेडियम इथं हलवण्याचे तोंडी आदेश दिले होते. मात्र अद्याप त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.