27.6 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home Top News शेतातील विहिरीत वाघाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ

शेतातील विहिरीत वाघाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ

0
121

गोंदिया,दि.११: शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला आपल्याच शेतातील विहिरीत वाघाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना गोरेगाव तालुक्यातील मूरदोली (सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र) येथे आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील मूरदोली येथील शेतकरी रोशनलाल कटरे हे आज सायंकाळी आपल्या शेतातील (सर्वे नंबर १८१) पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. शेतात फिरत असताना त्यांना विहिरीतून दुर्गंधी आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. विहिरीत वाघ मृत अवस्थेत आढळल्याचे पाहताच शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली.शेतकरी कटरे यांनी वेळ न गमावता सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे (NNTR) उपसंचालक, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनकर्मचाऱ्यांचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.

मृत्यूचे कारण अस्पष्ट, तपास सुरू वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला असून, विहिरीतून वाघाचा मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा वाघ विहिरीत नेमका कसा पडला? पाण्याचा अंदाज न आल्याने तो चुकून विहिरीत पडला की यामागे शिकारीचा काही संशयास्पद प्रकार आहे? याचा तपास वनविभागाकडून केला जात आहे. शवविच्छेदनानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे मूरदोली आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पुढील तपास सुरू आहे... “घटनेची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मृत वाघाला विहिरीबाहेर काढून नियमानुसार पुढील सर्व कायदेशीर कार्यवाही आणि तपास केला जात आहे.” — प्रितमसिंह कोडावे उपसंचालक, NNTR, गोंदिया.