24.8 C
Gondiā
Tuesday, September 1, 2026
Home Top News MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी नवी मुंबईत निदर्शने; तुकाराम मुंडे किंवा महेश झगडे यांच्या...

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी नवी मुंबईत निदर्शने; तुकाराम मुंडे किंवा महेश झगडे यांच्या नियुक्तीची मागणी

0
17
  • औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने वातावरण तापले

  • पुण्यातून मोठा लढा उभारण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याचा आयोगाचा दावा पोलीस तपासात फोल ठरला आहे. या प्रकरणात एमपीएससी मधीलच तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने या महत्त्वाच्या संस्थेच्या पारदर्शकतेवर आणि प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी नवी मुंबईतील MPSC कार्यालयाबाहेर तीव्र प्रातिनिधीक आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी हातात “MPSC अध्यक्ष Go Back” आणि “अध्यक्ष हटाओ, MPSC बचाओ” अशा घोषणांचे फलक घेऊन जोरदार निदर्शने केली.

अध्यक्षांवर गंभीर आरोप; पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह

आरटीओ (RTO) कमिशनर असताना विवेक भीमनवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकारांचे आरोप झाले होते. असे गंभीर आरोप असतानाही केवळ राजकीय संबंधांमुळे शासनाने त्यांची या घटनात्मक पदावर नियुक्ती केली, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. ज्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे आणि गैरप्रकारांचे गंभीर आरोप आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससीचा कारभार पारदर्शक कसा राहू शकतो? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची मागणी

विवेक भीमनवार यांना तातडीने पदावरून हटवून त्यांच्या जागी तुकाराम मुंडे किंवा महेश झगडे यांच्यासारख्या कडक आणि स्वच्छ प्रतिमेच्या आयएएस अधिकाऱ्यांची MPSC च्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात यावी, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालीच परीक्षा प्रक्रिया पारदर्शक राहून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या या प्रकाराविरोधात राज्यातील परीक्षार्थी आणि विद्यार्थी आता एकवटले असून, या मागणीसाठी लवकरच पुण्यातून मोठा आणि तीव्र लढा उभारला जाणार आहे. नवी मुंबईतील या आंदोलनात सहभागी झालेल्या विविध संघटनांनी विद्यार्थ्यांच्या या आगामी लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.