पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या भ्रष्ट कारभाराची जबाबदारी स्वीकारून एमपीएससी अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा अथवा सरकारने त्यांना पदावरून बडतर्फ करावे, या मुख्य मागणीसह अन्य न्याय्य मागण्यांसाठी आज पुण्यात लाखो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला. या विराट मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली एकजूट आणि ताकद सरकारला दाखवून दिली.या आंदोलनात लोकप्रतिनिधी, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी मोर्चात प्रत्यक्ष सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला.
विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या:
-
एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा: पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षांनी पद सोडावे अथवा सरकारने त्यांना हटवून तिथे स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
-
फॉरेन्सिक ऑडिट: औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) पदाच्या पेपरफुटी प्रकरणात अटक झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्वच परीक्षांचे निष्पक्ष फॉरेन्सिक ऑडिट (Forensic Audit) करण्यात यावे.
-
ऑफलाईन परीक्षा व पारदर्शकता: आयोगाच्या कारभाराची सखोल झाडाझडती घेऊन परीक्षा पद्धतीत पूर्ण पारदर्शकता आणावी.
सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा: लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या भ्रष्ट कारभारावर सरकारने त्वरित अंकुश लावावा. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने या सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात; अन्यथा यापेक्षाही अधिक तीव्र आणि मोठे आंदोलन पुण्याच्या भूमीत उभारले जाईल, असा थेट इशारा या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आला.
प्रमुख नेत्यांची व प्राध्यापकांची उपस्थिती: या विराट मोर्च्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (SP) प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी आमदार मोहनदादा जोशी, काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि सीजेपीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.तसेच स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामांकित मार्गदर्शक प्रा. विठ्ठल कांगणे, प्रा. सचिन ढवळे , प्रा. यशवंत सोलाट, प्रा. अजित काकडे सर, प्रा. गणेश कड, प्रा. धनंजय मते, प्रा. समाधान कोकटे, प्रा. अनिकेत पाटील, सचिन म्हस्के सर आणि आंदोलनाची सूत्रे हाती घेणारे प्रमोद पाटील, किरण जगताप, संग्राम नराळे, अक्षय कांबळे, अमोल अतकरे (जॉली), स्वप्नील भिसे, प्रविण पाटील, दीपक कसबे, नितीन गिते, अजय जगताप, निकेतन शिंदे, साहेबराव क्षीरसागर, सिद्धांत जांभुळकर, ऋषिकेश गांगुर्डे, कुणाल दिलपाक, तनया साठे, शकील शेख, साक्षी खंडावळे, स्नेहा बावनकर यांच्यासह राज्यभरातून आलेले शेकडो विद्यार्थी प्रतिनिधी व हजारो परीक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




