-
तेलंगणाला मजुरीसाठी निघालेल्या मध्य प्रदेशातील मजुरांवर नागराजवळ कोसळला भीषण आघात
-
मृतकांमध्ये ३ वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश; सर्व जखमींवर गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
गोंदिया: गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला. गोंदियाकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत एका ३ वर्षांच्या चिमुरड्यासह ६ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर परिसरातील रहिवासी असलेले मजूर पिकअप वाहनाने (MP-15 T 3495) तेलंगणातील जगतीहाल, करीम नगर येथे रोजगारासाठी निघाले होते. मात्र, नागरा गावाजवळ गोंदियाकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (MH-35 AJ-2547) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
अपघातातील मृतक आणि जखमींची माहिती-या दुर्दैवी अपघातात आरुष मात्रे (वय ३ वर्षे, रा. सावरी), किरण संतोष वैद्दे (वय २६ वर्षे, रा. लोडाना), संतोष मात्रे (वय ३८ वर्षे), सुशिला मात्रे (वय ३५ वर्षे, दोन्ही रा. किन्ही), रुपसेन सत्यकर (वय ३५ वर्षे) आणि ज्योती सत्यकर (वय ३२ वर्षे) या ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात भुमेश्वर मात्रे (४७), संगीता मात्रे (३५), राजेंद्र पंचाले (३०), लक्ष्मी पंचाल (२७), संतोष वैद्दे (३५), राकेश बाहे (२४) आणि चालक संदीप बाहे हे गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिकांची मदतीसाठी धाव, पोलिसांकडून तातडीने कारवाई
अपघाताचा भीषण आवाज होताच परिसरातील नागरिकांनी आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेहांचे शवविच्छेदन (पोस्ट मार्टम) जिल्हा रुग्णालयात सुरू असून पोलिसांचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे.याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. एकाच परिसरातील ६ जणांचा अपघातात मृत्यू झाल्याने बालाघाट आणि गोंदिया परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.




