औरंगाबाद – धनंजय मुंडे यांचा अंतरिम जामीन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला असून पोलिसांना कारवाईचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. परळी येथील संत जगन्मित्र सहकारी सूत गिरणीने बीड जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणी मुंडे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आज सुनावणी झाली. त्यानंतर मुंडे यांच्या अर्जाला स्थगिती दिल्याच्या बातम्या आल्या. मात्र अद्याप कोर्टाने या प्रकरणी अंतिम निर्णय दिला नसून दुपारी साडेतीननंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे त्यानंतरच या प्रकरणी खरी परिस्थिती समोर येणार असल्याचे वृत्त आहे.
सूत गिरणी संचालक मंडळाने बीड जिल्हा बॅंकेकडून कर्ज मंजूर करून घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर सूत गिरणीकडून बॅंकेला देण्यात आलेले चेक परत गेल्यामुळे बॅंकेच्या व्यवस्थापकांनी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मुंडे आणि सूत गिरणीच्या तत्कालिन संचालक मंडळाविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंडे यांनी न्यायालयात अर्ज केला होता.