वी दिल्ली, दि. १२ – देशभरातील ७०० हून अधिक विद्यापीठांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला असून २०१५ -१६ या शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यापीठांमध्ये श्रेणी पद्धत आणि सेमीस्टर पॅटर्न राबवणे बंधनकारक केले जाणार आहे.
भारतात सध्या ७२६ विद्यापीठ असून या विद्यापीठांमध्ये सुमारे २ कोटी ८० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र यातील बहुतांशी विद्यापीठांमध्ये गुणपद्धतीचा अवलंब केला जातो. देशातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा निर्माण करुन विद्यापीठांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी यूजीसीने पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि सर्व राज्यांचे शिक्षण मंत्री यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विद्यापीठांमध्ये श्रेणी पद्धत लागू करण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
याशिवाय चॉईस बेस क्रेडीट सिस्टम आणि क्रेडीट फ्रेमवर्क फॉर स्किल डेव्हलपमेंट या पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देशही युजीसीने सर्व विद्यापीठांना दिले आहे. यामध्ये विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार विषय निवडू शकतात. या दोन्ही पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यांना विविध विषयांची माहिती मिळू शकेल असे मत शिक्षणतज्ज्ञांनी मांडले.