भाजप आमदाराशी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याने आयुक्तांची बदली

0
12

पुणे- पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बाकोरीया यांची एक वर्षाच्या आतच क्रीडा आणि युवा विभागाचे आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बाकोरिया यांनी पुण्यातील भाजपच्या एका विद्यमान आमदाराशी संबंध असलेल्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले होते. संबंधित आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत वजन वापरल्याने बाकोरीया यांची वर्षभराच्या कालावधीत बदली करण्यात आली आहे. आयएएस दर्जाच्या अधिका-यांची तीन वर्षानंतर बदली करण्याचा नियम आहे. त्याला फाटा देत दुस-यांदा निवडून आलेल्या आमदाराने बाकोरीयांना धडा शिकवायचा या हेतून बदली घडवून आणली आहे. दरम्यान, बाकोरीया यांच्या बदलीविरोधात पुण्यातील 10 स्वंयसेवी संस्थांनी मुख्यमंत्र्यांना आज सकाळी तत्काळ ईमेल करीत त्यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारने आमच्या मागणीचा विचार करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

याबाबत सजन नागरी मंचाचे विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे की, बाकोरीया यांची बदली होण्याचे कोणतेही कारण नव्हते. बाकोरीया यांनी वर्षभरात नजरेत भरेल असे काम केले आहे. त्यांनी स्वच्छ पुणे यावर चांगले काम केले आहे. त्याच्या बदलीविरोधात आम्ही मुख्यमंत्र्यांना ई-मेल केले आहेत. येत्या काही दिवसात त्यांची भेटही घेण्याचा प्रयत्न करू. यात मुख्यमंत्र्यांची प्राथमिक चूक नसल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील एका आमदाराने त्यांची बदली घडवून आणली आहे. मात्र, त्यांची बदली आम्ही रद्द करण्यास मुख्यमंत्र्यांना भाग पाडू असे वेलणकर यांनी सांगितले.

आपले म्हणणे न ऐकल्याने बाकोरीयावर राग- बाकोरीया यांनी भाजपचे आमदाराशी संबंधित असलेल्या ठेकेदाराला चुकीचे काम केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकले होते. त्यावेळी संबंधित आमदाराने बाकोरीया यांना फोन करून व भेटून तो विषय संपविण्यास सांगितले होते. मात्र, बाकोरीयांनी नियमानुसार केलेल्या कारवाईबाबत अचानकपणे निर्णय फिरवणे शक्य नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे संबंधित आमदाराचा राग बाकोरीयांवर होता. आता राज्यात भाजपचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित आमदाराने वजन वापरत बाकोरीयाची बदली घडवून आणली आहे.

चक्रवर्ती व आशिष शर्मांवर फडणवीसांची मेहरनजर- गेल्याच आठवड्यात तब्बल 42 वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर मंगळवारी आणखी 17 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाच्या सचिवपदी देबाशीष चक्रवर्ती आणि जमाबंदी आयुक्त म्हणून आशीष शर्मा यांची बदली करण्यात आली असतानाही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यास नकार देणार्‍या या दोन अधिकार्‍यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहरनजर दाखविली आहे.