कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचा अपघात, घसरले 9 डब्बे

0
11

माजी खासदार बोपचेंसह आ.गाणार व जायस्वाल सुरक्षित

मुंबई,दि.29 – मुंबई – कसारा घाटाजवळ दुरंतो एक्सप्रेस रुळावरुन घसरले आहेत. नागपूरकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या या गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरले आहेत. आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानकादरम्यान रुळावर पावसामुळे दगड-माती आल्यामुळे सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. जोरदार पाऊस आणि धुक्यामुळे चालकाला आंदाज आला नाही. चालकानं प्रसंगावधान दाखवून लगेच ब्रेक लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. विशेष म्हणजे अपघात झालेल्या डब्यामध्ये भंडारा-गोंदियाचे माजी खासदार व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय राजकीय समन्वयक डा.खुशाल बोपचे, शिक्षक आमदार ना.गो.गाणार आणि रामटेकचे माजी आमदार आशिष जायस्वाल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे गोंदिया जिल्हा महासचिव रविकांत बोपचे हे सुध्दा होते.या अपघातात जिवितहानी कुठलीही झाली नसून सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती माजी खासदार डाॅ.बोपचे यांनी बेरार टाईम्स शी बोलतांना दिली.सर्व आजी माजी लोकप्रतिनिधीही सुरक्षित असून रेल्वेप्रशासनाने लगेच सहकार्याला सुरवात केल्याचेही सांगितले.अपघाताच्या वेळी सुद्धा पाऊस सुरूच असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत. विशेष म्हणजे, देशात रेल्वे अपघाताची 10 दिवसांतील ही तिसरी मोठी घटना आहे.

इंजिन, ए.च – 1, ए 1 आणि ए 2 यासह 9 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. यामुळे मुंबईकडे येणारी अप आणि-डाऊन मार्गावरील रेल्वेवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातात कोणत्याही जिवीतहानी झालेली नोही. मात्र अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. रुळावरुन घसरलेल्या डब्ब्यातून जखमी प्रवाशांना बाहेर काढत असल्याचे चित्र सध्या तिथे आहे. रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. या अपघातामूळे मुंबई-नागपूर मार्गावरील रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली आहे.सकाळी साडेसहापासून वाहतूक ठप्प झाल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. घसरलेले डबे हटविण्यासाठी रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, आज दिवसभर वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता आहे. कल्याण टिटवाळ्या दरम्यान कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसची व्यवस्था केल्याची माहिती व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली.

एलएसजी डब्यांमुळे मोठी जीवितहानी टळली…
– नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे एकूण 9 डबे इंजिनसह घसरले आहेत. सामान्य ट्रेन आणि डबे असते, तर जीवितहानी झाली असती. मात्र, डब्यांचे तंत्रज्ञान एलएसजी असल्याने मोठ्या जीवितहानीचा धोका टळला.
– एलएसजी तंत्रज्ञान हे जर्मनीहून आले आहे. या विशेष तंत्रज्ञानाने बनवल्या जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यांचे वजन सामान्य डब्यांच्या तुलनेत निम्मे असते. त्यामुळे, डीरेलमेंटनंतर होणाऱ्या दुखापतीचा धोका कमी झाला.
– सामान्य रेल्वेचे डबे लोखंडी असल्याने त्यांचे वजन 80 टनाच्या जवळपास असते. मात्र, एलएसजी टेक्नॉलोजीवर आधारित डबे अॅल्युमिनियमने बनवले जात असल्याने त्यांचे वजन 40 ते 45 टन एवढे असते.
– ज्या प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली, ते वरच्या बाकावर झोपले होते. ट्रेन घसरल्याने बसल्यानंतर झटक्यांमुळे ते खाली पडले. जखमींमध्ये त्यांचाच प्रामुख्याने समावेश आहे.
ह्या रेल्वे रखडल्या
विदर्भ एक्स्प्रेस
अमरावती एक्स्प्रेस
सेवाग्राम एक्स्प्रेस
पंचवटी एक्सप्रेस
कल्याण कसारा लोकल रेल्वे वाहतूक सुद्धा विस्कळीत
हेल्पलाईन नंबर CSTM – 022-22694040
हेल्पलाईन नंबर ठाणे – 022-25334840
हेल्पलाईन नंबर कल्याण – 0251– 2311499
हेल्पलाईन नंबर नागपूर – 0712-2564342