काश्मीरमध्ये हिमस्खलनात पाच जणांचा मृत्यू

0
6

श्रीनगर,दि.6- उत्तर काश्मीरमधील कुपवाडयातील तंगधारमध्ये हिमस्खलनात आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. मृतांमध्ये पर्यटकांचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी पर्यटकांची गाडी कुपवाडयाहून करनाह येथे येत असताना ही दुर्घटना घडली. हिमस्खलनात पर्यटकांची गाडी बर्फाखाली गाडली गेली. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले.

तंगधारच्या साधना टॉपजवळ ही घटना घडली. शुक्रवारी दोन जणांचे मृतदेह हाती लागले त्यात 10 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. ज्या कुपवाडा-करनाह मार्गावर ही दुर्घटना घडली तो मार्ग बर्फवृष्टीमुळे हिवाळयाच्या तीन महिन्यांमध्ये बंद असतो. सुलेमान (10) आणि टॅक्सी चालक झहून अहमद या दोघांचे मृतदेह काल सापडले होते. रात्रीच्यावेळी मदतकार्य थांबवण्यात आले होते. दुर्घटना अत्यंत दुर्गम भागात घडल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी असून बर्फवृष्टीही सुरु आहे. हिवाळयात काश्मीरमध्ये हिमस्खलनाच्या घटना घडत असतात. भारताने आपल्या अनेक जवानांना हिमस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये गमावले आहे.