पॅरोलवरील कैद्याची मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून आत्महत्या

0
8

मुंबई,दि.09(वृत्तसंस्था)-पैठण येथील खुल्या कारागृहात मेहुणीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मुंबईचा हर्षल सुरेश रावते (४४) या कैद्याने गुरुवारी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून नव्या इमारतीच्या त्रिमूर्ती प्रांगणात उडी मारून आत्महत्या केली. हर्षल १० जानेवारीपासून पॅरोलवर होता. गुरुवारी त्याच्या पॅरोलचा शेवटचा दिवस होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी खून प्रकरणात झालेल्या शिक्षेमुळे दुरावलेले नातेवाईक आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. या संदर्भात तपशील असलेली एक सुसाइड नोट त्याच्या खिशात सापडली आहे. मंत्रालय इमारतीच्या त्रिमूर्ती प्रांगणात एक तरुण पडला असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता या तरुणाने  पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याचे स्पष्ट झाले. त्याला गंभीर अवस्थेत  कर्मचारी व पोलिसांनी तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या खिशात सापडलेले ओळखपत्र व इतर कागदपत्रांवरून त्याचे नाव हर्षल सुरेश रावते असल्याचे स्पष्ट झाले. तो  चेंबुरमधील रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे चेंबुरमध्ये मसाल्याचे दुकान आहे.

मेहुणीच्या हत्येप्रकरणी हर्षलवर ठाणे पोलिसांत गुन्हा नोंद होता. त्यात त्याला जन्मठेप झाली. २०१४ पासून हर्षल पैठणच्या खुल्या कारागृहात होता. पैठण येथील कारागृह अधिक्षक सचिन साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल या खुल्या कारागृहात कैद्यांना संगणकाचे प्रशिक्षण देत होता.दरम्यान, १० जानेवारीपासून तो एक महिन्याच्या पॅरोलवर (रजा) गावी गेला होता. गुरुवारी त्याच्या पॅरोलचा शेवटचा दिवस होता, अशी माहिती राज्याच्या तुरुंग विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.हर्षल याच्या खिशात सुसाइड नोट सापडली. त्यात त्याने आपण मेहुणीचा खून केल्याचे नमूद करून या गुन्ह्यात झालेली शिक्षा कमी व्हावी म्हणून प्रयत्न करत आहोत, असे नमूद केले आहे.