कोसमतोंडी आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावू – पालकमंत्री बडोले

0
30

सडक अर्जुनी,दि.९ः-तालुक्यातील कोसमतोंडी परीसरातील ज्या काही समस्या आहेत त्या त्वरित मार्गी लावण्यात येतील आणि कोसमतोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावू. तसेच या परिसरातील शेतकर्‍याच्या समस्येची जाण असून शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करून दुष्काळी मदत देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
तालुक्यातील कोसमतोंडी येथील गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या शिलाबाई चव्हान होत्या. विशेष अतिथी म्हणून पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेशजी कठाणे, कार्यकारी अभियंता आर.एस.वैरागकर, माजी सभापती कविताताई रंगारी, बाजार समिती सभापती डॉ.अविनाश काशिवार, सरपंच वंदनाताई सोनटक्के, उपअभियंता टाकसांडे, उपसरपंच महेंद्र पशिने उपसरपंच, पोलीस पाटील लताताई काळसर्पे, जगदीश काशिवार,व सर्व ग्रा.प.सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.यावेळी ना.राजकुमार बडोले यांनी विशेष म्हणजे या भुमिपुजन कार्यक्रम संपताच कोसमतोंडी येथील रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नंदलाल वाघाडे यांचे घरी जाऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि वनविभागाकडून मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. तसेच नंदलाल वाघाडेला तात्पुरती २000रुपयांची मदत दिली.कार्यक्रमाचे संचालन जगदीश काशिवार यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील नागरिक व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.