मराठी-इंग्रजीतील ७२ हजारावर पर्यायी शब्दांचा ‘शासन शब्दकोश’

0
12

नागपूर,दि.15 : शासकीय कार्यालयांमधील मराठी भाषेचा जास्तीतजास्त वापर व्हावा, या उद्देशाने भाषा संचालनालयाने पुढाकार घेत राजभाषा मराठीतील पर्यायी इंग्रजी शब्दांचा शासन शब्दकोशाचा मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे. शासन शब्दकोश भाग-एक असे या मोबाईल अ‍ॅपला नाव देण्यात आले असून, यात निवडक शब्दकोशातील ७२,१७१ पर्यायी शब्दांचा समावेश आहे.या शब्दकोशात सध्या ७२,१७१ पर्यायी शब्दांचा अर्थ व पर्याय उपलब्ध आहे, कालांतराने त्यात आणखी वाढ होईल, असा विश्वासही सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी व जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.
हा शब्दकोश तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाषा संचालनालयाचे विभागीय सहायक संचालक हरेश सूर्यवंशी यांनी याबाबतची माहिती बुधवारी माहिती कार्यालयाच्या माध्यम संवाद या कार्यक्रमात दिली. सूर्यवंशी यांनी सांगतले की, या शासन शब्दकोश मोबाईल अ‍ॅपचे लोकार्पण मराठी भाषा गौरवदिनी करण्यात आले. यात भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या शब्दकोशापैकी शासन व्यवहार कोश, प्रशासन वाक्यप्रयोग, न्यायव्यवहार कोश व कार्यदक्षिका हे चार निवडक शब्दकोश व न्यायव्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांना मराठीत अर्थ व पर्याय आणि मराठी शब्दांना इंग्रजीत अर्थ व पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मोबाईल अ‍ॅपची रचना अत्यंत सहज व सुलभ आहे. हा मोबाईल अ‍ॅप शासनाच्या वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करता येतो.
या मोबाईल अ‍ॅपमध्ये राज्य व केंद्र शासनाचे अधिनियमसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सध्या ७५० शासकीय अधिनियम उपलब्ध आहेत. या अधिनियमाची पीडीएफ स्वरूपातील मराठी प्रत उपलब्ध आहे ती डाऊनलोडसुद्धा करता येऊ शकते.