येवला येथे ग्रामसेवकाला अधिकाऱ्यासमोर मारहाण

0
21

येवला- रोहयोच्या कामाचे बिल काढले नाही म्हणून पिंपळगाव लेप येथील ग्रामसेवकाला येवला पंचायत समितीच्या दारातच मारहाण आज (शुक्रवार) करण्यात आली. पुढे ओढत नेत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातही मारहाण केली. मारहाण करण्याचा प्रकारामुळे पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांसह ग्रामसेवकांनी आरोपीच्या अटकेची मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

आज दुपारी पावणे एकच्या सुमारास पिंपळगाव लेप चे ग्रामसेवक उमेश साहेबराव निकम हे कार्यालयीन कामकाजासाठी इंदिरा आवास योजनेसंदर्भातील कागदपत्रांची फाईल घेऊन पंचायत समितीमध्ये आले होते. मारुती शेळके (रा. ठाणगाव ता. येवला) याने मागुन येऊन ग्रामसेवक उमेश निकम यांची कॉलर पकडून त्यांच्या कमरेला चाकू लावला. माझे मागील बिल का देत नाही? असे म्हणत मारुती शेळके याने निकम यांना मारहाण करत गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांच्या दालनात नेले. तेथेही अहिरे यांच्यासमोर मारुती शेळके याने हा माझे बिल काढीत नाही, असे म्हणत निकम यांना शिवीगाळ करीत हाताने व लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करायला सुरवात केली. सुनील अहिरे यांनी हा प्रकार योग्य नाही असे सुनावताच मारुती शेळके हा निकम यांच्या हातातील इंदिरा आवास योजनेची कागदपत्रांची फाईल घेऊन पळून गेला.