बंदेच्या संस्थेने मृत विद्यार्थ्याच्या नावावर लाटली शिष्यवृत्ती

0
23

गडचिरोली : ज्या सावित्रीबाई फुले यांनी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी यातना सहन केल्या. त्यांच्या नावावर शिक्षण संस्था चालविणार्‍या संस्थाचालक अमित बंदे याने सावित्रीबाई फुले इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड टेक्नॉलाजी या संस्थेत मृत विद्यार्थ्याच्या नावावर ३५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती उचल केल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. अशा संस्थाचालकांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आता विद्यार्थी संघटना सरसावल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात गाजत असलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात दररोज नवी माहिती उजेडात येत आहे. जिल्ह्यातील २५ शिक्षण संस्थांच्या कागदपत्रांची तपासणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सुरू केली आहे. अनेक गावात जाऊनही विद्यार्थ्यांच्या नावाची पडताळणी पोलीस पथक करीत आहे. बहुतांशी शिक्षण संस्थाचालकांनी मृत व्यक्तीला विद्यार्थी दाखवून त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती उचलल्याची बाबही पुढे आली आहे. गडचिरोलीतील सावित्रीबाई फुले इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड टेक्नॉलाजीमध्ये चंदू तुकाराम नैताम या विद्यार्थ्याचा प्रवेश २0१३-१४ या वर्षात डिप्लोमा इन कॉम्प्युटर ग्रॉफिक्स या अभ्यासक्रमात दाखविण्यात आला. तसेच त्याच्या नावाने ३५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती काढण्यात आली. मात्र या मुलाचा मृत्यू २१ नोव्हेंबर २0१२ रोजी अपघातात झाला असतानाही त्याची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचे बनावट प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र तयार करून त्याचा प्रवेश अमित बंदे या संस्थाचालकाने आपल्या संस्थेत दाखविला व त्याच्या नावावर २0१४ मध्ये शिष्यवृत्ती उचलली.
केवळ चंदू नैताम याच मृत व्यक्तीच्या नावावर नाही, तर अशा अनेक मृत व्यक्तींना आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून बहुसंख्य संस्थाचालकांनी दाखविले आहे, असे तपास अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले आहे.
चंदू नैताम याचे मृत्यू प्रमाणपत्र दाखविल्यानंतरही संस्थाचालक गैरव्यवहार झाल्याचे मान्य करीत नव्हते. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गडचिरोली येथील सावित्रीबाई फुले मॅनेजमेंट अँन्डटेक्नॉलाजी संस्थेचे संस्थापक अमित बंदे अँस्पायर कॉलेज ऑफ अडव्हॉन्स टेक्नॉलाजीचे शहाबाज हैदर (चंद्रपूर) व शिवनेरी कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूटचे विघ्नोज राजुरकर (राजुरा) हे तिघे अद्यापही फरार आहेत. पोलिसांच्या हाती ते लागलेले नाहीत.