
कामठीच्या खाणीचे लोकार्पण : पैेनगंगा खाणीचे उद्घाटन, वर्षाला सात मेट्रिक टन कोळसा मिळणार
चंद्रपूर : येत्या वर्षभरात देशात २२ नव्या कोळसा खाणी सुरू होणार असून वीज उत्पादनात देश स्वयंभू होणार असल्याचा आशावाद केंद्रीय कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. तर, वीज उत्पादन आणि वीज निर्मितीच्या दिशेने महाराष्ट्र सरकारकडून सुधारणा सुरू असून राज्याची विजेची गरज ओळखून केंद्र सरकारने तीन नव्या खाणी विदर्भात सुरू केल्याबद्दल केंद्राचे आभार मानत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज संकटावर मात करण्याचे आश्वासन रविवारी जनतेला दिले.
वेकोलिच्या वणी क्षेत्रांतर्गत येणार्या पैनगंगा ओपन कास्टचे भूमिपूजन रविवारी विरूर (गाडेगाव) येथे पार पडले. याच समारंभादरम्यान नागपूर जिल्ह्यातील वेकोलिच्या उमरेड क्षेत्रात येणार्या मकरधोकडा खाणीचे आणि वेकोलिच्या कामठी क्षेत्रात येणार्या भानेगाव या दोन्ही खुल्या खाणींचे लोकार्पणही पाहुण्यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. समारंभाला केंद्रीय भूपृष्ठ परिवहन वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायन आणि उर्वरक मंत्री हंसराज अहीर, उर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खासदार कृपाण तुमाणे, खासदार अविनाश पांडे, खासदार अजय संचेती, आमदार संजीव रेड्डी, आमदार संजय धोटे, आमदार नाना शामकुळे, वेकोलिचे अध्यक्ष सुदीप्तो भट्टाचार्य व वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.
पैनगंगा खाणीतील सर्व कोळसा महाराष्ट्राला देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी केली. कोळशापासून युरिया तयार करण्यासाठी कोल ब्लॉक देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पुढील दोन वर्षात देशात २४ खाणी उघडण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. कोराडी येथे दोनशे खाटांचे रुग्णालय व नागपूरला कॅन्सर रुग्णालय वेकोलिच्या उत्तरदायित्व निधीतून उघडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या खाणीसाठी वेकोलिने पाच वर्षांपूर्वीच परवानगी मागितली होती. मात्र तत्कालिन सरकारने विलंब लावला. आम्ही मात्र सत्तेत येताच दोन महिन्यातच या खाणीला परवानगी दिली. ही परवानगी तेव्हाच मिळाली असती तर वीजसंकट कमी झाले असते, अशी टीकाही त्यांनी केली. ना. नितीन गडकरी म्हणाले, उद्योगांचे नाव निघताच विरोधाचा सूर आळवला जातो. पण उद्योगातूनच रोजगार, पैसा, सुविधा येतात, त्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. आपले सरकार शेतकर्यांच्या आत्महत्या रोखू इच्छिते. भूमी अधिग्रहणाच्या मुद्यावरून विरोधक चुकीचा आरोप करीत असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविक वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी केले तर आभार एस.एस. मल्ली यांनी मानले.