महाराष्ट्राच्या मंत्र्याने दिले नाही मालमत्ता तपशील

0
11

मुंबई – राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी त्यांची मालमत्ता जाहीर करण्याचा नियम एकाही मंत्र्याने पाळला नसल्याचे माहिती हक्क अधिकारातून केल्या गेलेल्या अर्जातून समोर आले आहे. कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या संदर्भातली माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे अर्ज करून मागितली होती तेव्हा या विभागाने एकाही मंत्र्याने त्यांच्या मालमत्तेसंबंधी माहिती दिलेली नसल्याने ती देता येत नाही असे उत्तर दिले आहे.

सत्तेवर असलेल्या फडणवीस सरकारात मुख्यमंत्र्यांसह १८ मंत्री आणि १२ राज्यमंत्री आहेत. पारदर्शकता आणि स्वच्छ कारभार असा नारा देऊन सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारातील कुणीही आपल्या मालमत्तेसंबंधी माहिती सार्वजनिक केलेली नाही. ही माहिती त्यांनी राज्यपालांकडे सूपूर्द करणे आवश्यक आहे मात्र त्यासंबंधी अजून कोणतीच हालचाल झालेली नाही. पूर्वी सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारवरही मंत्र्यांची मालमत्ता सार्वजनिक करण्यासंदर्भात खूप दबाव टाकला गेला होता मात्र तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी फेटाळली होती. नंतर ज्या मंत्र्यांनी मालमत्तेसंबंधी माहिती दिली त्यांची केवळ नावे ऑनलाईन जाहीर करण्यात आली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांना या संदर्भात १४ नोव्हेंबर २०१४ व ९ मार्च २०१५ या तारखांना पत्रे पाठविली गेली होती त्याचे काय झाले याची माहितीही माहिती हक्क अधिकारात विचारली गेली असता या संबंधीच्या फाईल मुख्यमंत्र्यांकडे पेंडींग असल्याचे उत्तर दिले गेले आहे.