भू-संपादनाबाबत खुल्या चर्चेला तयार- अण्णा हजारे

0
14

पुणे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा भू-संपादन विधेयकाबाबत गृहपाठ कच्चा आहे. गडकरींनी आम्हाला सरकारसोबत खुल्या चर्चेसाठी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारत आहे. मोदी सरकारने चर्चेची तारीख व ठिकाण आम्हाला सांगावे असे प्रत्त्युत्तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गडकरींना दिले आहे.
भू-संपादन विधेयकाला विरोध करीत असल्यामुळे नितीन गडकरींनी अण्णा हजारे आणि सोनिया गांधी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता अण्णांनी सरकारचे आवाहन स्वीकारल्याचे सांगितले.
अण्णा हजारे म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर मोदींनी या विधेयकाबाबत समन्वय साधण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, भूसंपादन विधेयकाबाबत गडकरींचा गृहपाठ कच्चा असून त्यांच्याशी आम्ही काय चर्चा करणार?. केंद्रातील मोदी सरकार हे शेतक-यांचा विचार करीत नाही तर भांडवलदारांचाच जास्त विचार करते. या भू-संपादन विधेयक शेतक-यांच्या मूळावर येणारे आहे याची आम्हाला चांगली जाणीव आहे. शेतक-यांना देशोधडीला लावण्यासाठीच हा उद्योग सुरु आहे. म्हणूनच गडकरींनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या चार लोकांशी खुली चर्चा करावी. आम्हाला सरकारने वेळ व तारखेसह ठिकाण कळवावे आम्ही हजर राहू. ही चर्चा माध्यमांसाठीही खुली ठेवा व जनतेला पाहू द्या या चर्चेत काय बोलणे होते ते असेही अण्णांनी सांगितले.