‘क’ आणि ‘ड’ श्रेणीची रिक्त पदे भरणार : मुख्यमंत्री

0
13

मुंबई-राज्य सरकारमध्ये क्षमतेच्या १४ टक्के पदे रिक्त असल्याने सेवेवर परिणाम होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर क आणि ड श्रेणीतील रिक्त पदे भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान, अधिकारी आणि कर्मचारी महासंघाची ८० हजार रिक्त पदे भरण्याची मागणी मान्य झाल्यामुळे संघटनेने या घोषणेचे स्वागत केले आहे.
सामान्य प्रशासन खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना, शासकीय सेवेत लिपिक तसेच अन्य पदांसाठी एकत्रित भरती केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शासकीय सेवेत मोठय़ा प्रमाणावर पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याची तक्रार अनेक आमदारांनी केली होती.
शासनाच्या वतीने लवकरच सेवा हमी कायदा केला जाणार आहे. यात ठरावीक कालावधीत कामे करण्याचे बंधन येणार आहे. हा कायदा करण्यापूर्वी क आणि ड श्रेणीतील सुमारे ८० हजार पदे भरली जावीत, अशी मागणी अधिकारी आणि कर्मचारी महासंघाने केली होती, असे संघटनेचे ग. दि. कुलथे यांनी सांगितले.
कोणती पदे भरणार?
क वर्ग – लिपिक, साहाय्यक, अव्वल कारकून, कृषी साहाय्यक, चालक
ड वर्ग – शिपाई व तत्सम पदे