धनगर आरक्षणावरून खडसे-तटकरेंत खडाजंगी

0
6

मुंबई- धनगर समाजाच्या आरक्षणावरुन आज विधानपरिषदेत सत्ताधारी भाजप आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाला सामावून घेणे घटनाबाह्य असल्याची शिफारस आघाडी सरकारच्या काळात नेमलेल्या समितीने केली होती. आता या मुद्द्यावरून विरोधकांनी राजकारण करू नये. आम्ही कोणत्याही स्थितीत धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. त्यांच्या या उत्तरानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर विरोधकांनी गोंधळ घातला. त्याचवेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची भूमिका काय, असा प्रश्न सुनील तटकरे यांनी उपस्थित केला.

तटकरेंच्या मागणीनंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांनी याबाबत सभागृहात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. सावरा काहीही ठोस उत्तर देत नव्हते व गोलमाल उत्तरे देत होते. त्यामुळे विरोधकांनी आरक्षणाबाबत तांत्रिक मुद्दे काढत सभागृहात गदारोळ करण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महसूलमंत्री एकनाथ खडसे मध्येच उभा राहिले व बोलू लागले. यावर तटकरेंनी खडसेंना तुम्ही मध्येच का बोलायला लागला. आदिवासी मंत्री सावरांना उत्तर देऊ द्या, सावरांना गप्प बसवून बोलायला तुम्ही काही मुख्यमंत्री आहात काय? अशी शेरेबाजी करीत तटकरे यांनी खडसेंना डिवचले.
आदिवासी आरक्षणात धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही, असा निष्कर्ष या समितीने काढला आहे. त्यावरून तुम्ही १५ वर्षे सत्तेत असताना धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही, असा प्रश्न खडसे यांनी विरोधकांना विचारला.