नक्षल्यांच्या हल्यात छत्तीसगडमध्ये सीआरपीएफचे तीन जवान शहीद

0
13
file photo

रायपूर(वृत्तसंस्था)दि.29ः- छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली असून यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान शहीद झाले आहे. तर अन्य एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शहीद झालेले जवान हे १९९ च्या बटालियनचे होते.
बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड परिसरातील केशकुतुल गावाजवळील जंगलात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफच्या १९९ च्या बटालियनचे सहायक उपनिरीक्षक मधू पाटील, सहायक उपनिरीक्षक मदन पाल आणि हवालदार ताजू ओटी हे तीन जवान शहीद झाले तर अन्य एक जवान जखमी झाला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली. या चकमकीदरम्यान वाहनात बसलेल्या एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण जखमी झाल्याची माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली.
भैरमगड परिसरात सीआरपीएफची एक तुकडी गस्त घालण्यासाठी नुकतीच रवाना झाली होती. ही तुकडी केशकुतुल गावाजवळील जंगलात आली त्यावेळी नक्षलवाद्यांनी या जवानांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर प्रत्युत्तरात जवानानेही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले. त्यानंतर अन्य एका जवानाचा मृत्यू झाला. जखमींना भैरमगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांकडील एक एके-४७ रायफल, चार मॅग्झीन, एक बुलेट प्रूफ जॅकेट आणि एक वायरलेस सेट लुटून नेला, असे पोलिस अधिकार्‍याने सांगितले.