मल्टिप्लेक्‍स, हॉटेल-ढाब्यांना सरकारचा दणका

0
9

मुंबई – दूध, पाण्याची बाटली, कोल्ड्रिंक किंवा अन्य खाद्यपदार्थ कमाल किरकोळ किमतीपेक्षा (एमआरपी) अव्वाच्या सव्वा किमतीस विकणाऱ्या राज्यातील मल्टिप्लेक्‍स, हॉटेल, ढाब्यांना जोरदार दणका देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा तक्रारी आल्यास विक्रेत्याच्या विरोधात तत्काळ अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्याबाबत अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आधिपत्याखाली वजन व मापे नियंत्रक विभाग कार्यरत आहे. कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेले संजय पांडे या विभागाचे प्रमुख आहेत. यापूर्वी पांडे यांनी चढ्या किमतीत घरे विकणाऱ्या बिल्डरांना दणका दिला होता. त्यांनी आता अन्न पदार्थ व अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे आपला मोर्चा वळविला आहे. राज्यातील ग्राहकांना “एमआरपी‘पेक्षा अधिक दराने वस्तू विकण्यात येत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे पांडे यांनी अस्तित्वात असलेल्या नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. “एमआरपी‘पेक्षा अधिक दराने वस्तूंची विक्री केली असता केंद्र सरकारच्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येते. यात 2 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असली तरी त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. यासाठी “अवाजवी शुल्क नियंत्रण कायद्यात‘ बदल करण्यात येणार आहे.

मल्टिप्लेक्‍स, हॉटेल, ढाब्यांवर तसेच अन्य ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, शीतपेयांची अधिक किमतीला विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सदरच्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवाव्या लागत असल्याने किमती वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेते सांगतात. परंतु, फ्रीज आणि वीजबिलांचा विचार करूनच उत्पादक कंपन्यांनी वस्तूंची “एमआरपी‘ ठरविलेली असल्याने विक्रेत्यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे वजन व मापे नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आले. येत्या काही दिवसांतच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी कॅबिनेटसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.