30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home Top News भागवत सप्ताहात ३00 जणांना विषबाधा

भागवत सप्ताहात ३00 जणांना विषबाधा

0
30

लाखांदूर,दि.07ः- भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात गावभोजनासाठी आलेल्या ३00 जणांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथे सोमवारी पहाटे उघडकीस आली. पोटदुखी, हगवण व उलटीचा त्रास झाल्याने बाधितांना कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर अतिबाधितांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रोहणी गावात मागील ३१ डिसेंबर ते ६ जानेवारीदरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, रविवारी गोपालकाल्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर या कार्यक्रमाच्या समारोपाला आलेल्या परिसरातील हजारो नागरिकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर रात्रीपासून शेकडो विद्यार्थी, महिला व नागरिकांना पोटदुखी, हगवण व उलटीचा त्रास जाणवू लागल्याने संबंधितांनी कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. यावेळी कुडेगाव येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी बाधित रुग्णांची विचारपूस करून औषधोपचार करीत आरोग्य विभागाकडे तत्काळ वैद्यकीय चमू हजर करण्याची मागणी केली. पहाटेपर्यंत बाधितांचा आकडा फुगत गेला. अतिबाधित रुग्णांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून औषधोपचार सुरू आहेत.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आरोग्य प्रशासनाला तातडीने उपचार करण्याचे आदेश दिल्याने वैद्यकिय विभागाची चमू रोहणी गावात दाखल होऊन शेकडो विद्यार्थी महिला व नागरिक सध्या उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. या घटनेतील काही अतिबाधित रुग्णांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बाधितांवर औषधोपचार सुरू आहे.
विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी सुद्धा भेट देऊन प्रशासनाला सूचना केल्या. बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी महाराष्ट्र युवक शेतकरी संघटना व तालुका युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पर्शिम घेतले. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते व निवासी वैद्यकीय डॉ. निखील डोकरीमारे यांनीसुद्धा भेट देऊन पाहणी केली.